ABD26J78291
(((फोटो ओळ)) मुकुंदवाडी ः जयभावानी चौकातील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लीळाचरित्र प्रवचन समारोप सोहळ्याला उपस्थित संत-महंत आणि भाविक.
--
ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा
भक्तिमय वातावरणात समारोप
--
श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांचा जागर; संत-महंतांची उपस्थिती
----
सकाळ वृत्तसेवा
मुकुंदवाडी, ता. ३१ ः ईश्वरभक्ती, समता, सदाचार आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महिनाभराच्या ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा दृष्टांतस्थळ तथा लीळाचरित्र प्रवचन समारोप सोहळा रविवारी (ता. ३०) जय भवानी चौकातील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात भक्तिमय वातावरणात झाला. संत-महंतांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठी उपस्थिती होती.
वसंत शिंदे यांच्या पुढाकारातून १ ऑगस्टपासून इंद्रप्रस्थ सोसायटी, पुंडलिकनगर रोड येथील त्यांच्या निवासस्थानी हा सोहळा झाला. संतोषमुनी शास्त्री यांच्या वाणीतून महिनाभर चक्रधर स्वामींचे विचार आणि ब्रह्मविद्येतील विविध दृष्टांतांचे निरूपण करण्यात आले. मानवी जीवन प्रपंचातील दुःखांनी व्यापलेले असून, या दुःखातून कायमस्वरूपी मुक्तीसाठी ईश्वरभक्ती हाच मार्ग असल्याचा संदेश प्रवचनातून देण्यात आला. हत्तीच्या दृष्टांतासह विविध दृष्टांतांच्या माध्यमातून स्वामींच्या विचारांची व्यापकता आणि समाजप्रबोधनाची ताकद स्पष्ट करण्यात आली. ‘चक्रधर स्वामींनी स्त्री-पुरुष समानता, स्पृश्य-अस्पृश्य समानता तसेच सर्व जीव समान असल्याचा मानवतावादी विचार मांडला’, असे सांगत त्यांनी व्यसनमुक्त समाज, सदाचार आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी महानुभाव पंथाच्या कार्यावरही प्रकाश टाकला.
समारोप सोहळ्यास फलटणकर बाबा, वाडीकर बाबा, अवेराज बाबा, अशोकराज भांडारकर बाबा, सायराज बाबा, बांधकर बाबा आणि जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष ॲड. नानासाहेब झिंजुर्डे यांची उपस्थिती होती. प्रा. मोहन बाभूळगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
------