आईला वाचवायला धावली,
मुलीच्या हातावर सुरीने वार
छत्रपती संभाजीनगर : शेजारी महिलेने केलेल्या शिवीगाळीचा जाब विचारल्याने सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. महिलेने शेजारीणीला चापट मारून केस ओढले. यावेळी तिच्या गळ्यातील पोत तुटून सहा मणी गायब झाले. आईला वाचविण्यासाठी धावलेल्या मुलीच्या हातावर भाजी कापण्याच्या सुरीने वार करून तिलाही जखमी करण्यात आले. हा प्रकार पहाडसिंगपुरा परिसरात घडला.
याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ज्योती विनोद पवार (रा. मकबरा रोड, पहाडसिंगपुरा) असे संशयित आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रुबी अरबिंद चौधरी (वय ३२) यांनी फिर्याद दिली. चौधरी या घरासमोर कुकर दुरुस्तीचे दुकान चालवतात. १९ सप्टेंबरला सायंकाळी त्या दुकानात असताना शेजारी राहणाऱ्या ज्योती पवार यांनी त्यांच्याकडे पाहून शिवीगाळ केली. ‘शिवीगाळ का करता?’ अशी विचारणा केल्यावर ‘तुम्ही बाहेरून आलेले लोक खूप माजले आहात, तुम्हाला येथून हाकलावे लागेल’, असे पवार यांनी म्हटल्याचा आरोप आहे. चौधरी यांनी महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण घर खाली करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पवार यांनी त्यांच्या गालावर चापट मारून केस ओढले. यात गळ्यातील आठ मण्यांची पोत तुटली. दोन मणी मिळाले, मात्र सहा मणी मिळाले नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आईला सोडविण्यासाठी मुलगी पायल आली असता पवार यांनी भाजी कापण्याच्या सुरीने तिच्या डाव्या हातावर वार केला. यात रक्तस्राव झाला. घर खाली केले नाही तर ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार सुनील जगताप तपास करत आहेत.