जीआर रद्दची मागणी

जीआर रद्दची मागणी
Published on: 
क्रीडा आरक्षणातील कपात रद्द करा खेळाडू संघटनांची मागणी; गुणवंतांवर अन्याय होण्याची भीती धाराशिव, ता. २१ (बातमीदार) : शालेय क्रीडा स्पर्धांतील १४ व १७ वर्षांखालील वयोगटांना तसेच सांघिक स्पर्धांतील रौप्य व कांस्यपदक विजेत्यांना पाच टक्के क्रीडा आरक्षणातून वगळण्याबाबत राज्य शासनाने ५ ऑक्टोबरला काढलेला शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, पूर्वीप्रमाणे सर्व गुणवंत खेळाडूंना आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार शासनाच्या नव्या निर्णयामुळे शासकीय, निमशासकीय आणि अन्य क्षेत्रांतील नोकरीसाठी उपलब्ध असलेल्या पाच टक्के क्रीडा आरक्षणाच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय व राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये केवळ १९ वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंनाच पात्र ठरविण्यात आले आहे. तसेच सांघिक स्पर्धांमध्ये केवळ सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनाच आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे १४ व १७ वर्षांखालील गटांत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदके मिळविणाऱ्या खेळाडूंना आरक्षणापासून वंचित राहावे लागेल. वैयक्तिक स्पर्धांमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंनाही या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. फेन्सिंगसारख्या खेळांत तृतीय क्रमांकावर दोन खेळाडू असतात. त्यामुळे या खेळाडूंच्या संधीही मर्यादित होतील, अशी चिंता संघटनांनी व्यक्त केली आहे. सांघिक स्पर्धांमध्ये केवळ सुवर्णपदक विजेत्यांनाच आरक्षण दिल्यास रौप्य आणि कांस्यपदक मिळविणारे संपूर्ण संघ या लाभापासून वंचित राहतील. त्यामुळे खेळाडूंच्या भवितव्यावर परिणाम होऊन क्रीडा क्षेत्रातील सहभाग कमी होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. शासनाने हा निर्णय रद्द करून १४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही वयोगटांतील राज्य व राष्ट्रीय शालेय स्पर्धांमधील वैयक्तिक आणि सांघिक प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत खेळाडूंना पूर्वीप्रमाणे पाच टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे सचिव राजकुमार सोमवंशी, जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव प्रमोद डोंगरे आणि जिल्हा आट्यापाट्या मंडळाचे सचिव शरद गव्हार यांच्या सह्या आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com