चार गोवंशीय जनावरांची सुटका
आष्टी, ता. २ (बातमीदार) : शहरातील कुरेशी गल्ली परिसरात कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, आष्टी पोलिसांनी रविवारी (ता. १) पहाटे छापा टाकून चार जनावरांची सुटका केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमोडे यांना कुरेशी गल्लीत इम्तियाज कुरेशी यांच्या घरामागे गोवंशीय जनावरे असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने दोन पंचांसह पहाटे साडेचार वाजता छापा टाकला. यावेळी घरामागील बंद खोलीत आणि मोकळ्या जागेत चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसताना जनावरे दोरीने बांधल्याचे आढळले. यात अंदाजे दोन वर्षे वयाच्या तीन कालवडी आणि चार वर्षे वयाची एक गाय, असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी पंचनामा करून चारही जनावरे सुरक्षित संगोपनासाठी गोशाळेत पाठवली आहेत. पोलिस कर्मचारी बळिराम भाग्यवंत यांच्या फिर्यादीवरून शहानवाज कुरेशी आणि कादिर कुरेशी (दोघे रा. आष्टी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार परमेश्वर टगड करत आहेत.