चाराटंचाईने गोशाळाचालकांची चिंता वाढली
-----
प्रतिपशू प्रतिदिन १०० रुपये अनुदान द्या; मुख्यमंत्र्यांना निवेदन
----
हिंगोली, ता. २ : यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पशुपालकांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना जगविणे अवघड होत असल्याने राज्यातील सर्व नोंदणीकृत गोशाळांमधील पशुधनासाठी प्रतिदिन प्रतिपशू १०० रुपये चारा अनुदान द्यावे, अशी मागणी गोशाळा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी (ता. दोन) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन पाठविण्यात आले.
जिल्ह्यात नोंदणीकृत सुमारे ३० गोशाळा असून, यंदा अत्यल्प पावसामुळे चाऱ्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी, पशुपालकांसमोर जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. चारा मिळत नसल्याने जनावरांचे संगोपन करणे कठीण झाले आहे. चाराटंचाईमुळे काही भागांतील शेतकरी आपली जनावरे गोशाळांमध्ये आणून सोडत आहेत. मात्र, गोशाळांकडेही मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध नसल्याने या जनावरांचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न गोशाळाचालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे गोशाळांवरील आर्थिक भारही वाढत आहे. त्यामुळे शासनाकडे चारा अनुदानाची मागणी करण्यात आली. यावेळी गोशाळा महासंघाचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी यांच्यासह विविध गोशाळांचे चालक उपस्थित होते. शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा गोशाळा महासंघाने व्यक्त केली आहे.