सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा
कारवाँ फाउंडेशनतर्फे गौरव
धाराशिव, ता. २० (बातमीदार) : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शहरातील गुणवंतांचा कारवाँ फाउंडेशन (मुंबई) यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. शासकीय विश्रामगृहातील सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कारवाँ फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव केला जातो. याच उपक्रमांतर्गत धाराशिव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. फाउंडेशनच्या अध्यक्षा शाहिना मिरजणकर शहरात आल्यानंतर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी फुले-शाहू-आंबेडकर कृती समिती व बहुजन योद्धा सामाजिक संस्थेच्या वतीने मिरजणकर यांचे स्वागत करण्यात आले. शासकीय विश्रामगृहात झालेल्या सत्कार समारंभात डॉ. तबस्सुम सय्यद, गणेश वाघमारे, अब्दुल लतीफ, प्रा. अभिमान हंगरगेकर, डॉ. बाळासाहेब घाडगे, सरफराज पटेल आणि रौफ शेख यांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अंकुश उबाळे, संजय गजधने, प्रवीण जगताप, बाबासाहेब गुळीग, धनंजय वाघमारे, राजेंद्र धावारे, अमन शेख, संपतराव शिंदे, प्रवीण बनसोडे, श्रीकांत गायकवाड, अतुल लष्करे, बप्पा शिंदे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन बलभीम कांबळे यांनी तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.