शाहनूरवाडीत आजपासून चंडी होम महोत्सव
साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन, १८ ऑक्टोबरला महाप्रसाद
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः द आर्ट ऑफ लिव्हिंग आणि वैदिक धर्म संस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त शुक्रवार ते रविवार (ता. १६ ते १८) शहानूरवाडी येथील त्रिलोक सिंह जबिंदा लॉन्समध्ये चंडी होम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांच्या मूर्तींचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने शहरात २०१६ पासून हा उत्सव आयोजित केला जात आहे. बंगळुरू येथील मुख्य वेदपाठशाळेतील स्वामीजी व पंडितांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक पद्धतीने विविध होम व पूजाविधी होतील. शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) श्री महागणपती, नवग्रह, वास्तु व सुदर्शन होम, शनिवारी रुद्रपूजा, रुद्र होम, चंडी कलश स्थापना व चंडी पारायण, तर रविवारी महाचंडिका होम व पूर्णाहुती होईल. दुपारी एक वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ७ः३० ते सायंकाळी ६ः३० या वेळेत शक्तिपीठांच्या मूर्तींचे दर्शन घेता येईल. सत्संग व फराळाचीही व्यवस्था असल्याची माहिती आयोजक डॉ. अजित हजारी, शिवशंकर स्वामी, नंदकिशोर औटी, संजय भालेकर, प्रभंजन महातोले, अनिल देशमुख व देवेन लढ्ढा यांनी दिली. भाविकांनी या उत्सवात कुटुंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.