
छत्रपती संभाजीनगर : त्यांचे वय खेळण्या-बागडण्याचे. त्यातील एकाचा रविवारी वाढदिवस. त्या चिमुकल्याने वडिलांकडे ‘माझ्यासाठी केक आणा आणि सायकलचंही गिफ्ट द्या’, असा हट्ट धरलेला. लाडाचा म्हणून वडील त्याची इच्छा पूर्ण करणार होते. पण, नियतीला ते मान्य नव्हते. शनिवारी नेहमीप्रमाणे दोघेही खेळायला गेले. खेळताना त्यांचा बॉल खड्ड्यात पडला. बांधकामासाठी खोदलेला हा खड्डा काळ बनून आला. यात पाणी साचलेले होते. एकजण बॉल काढायला उतरला, पाठोपाठ दुसराही आला. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.