
बजाजनगर : चोर, दरोडेखोर हातात शस्त्रे घेऊन बिनधास्त रस्त्यांवर फिरत आहेत आणि पोलिस मात्र अजूनही ढाराढूर असल्याचा आणखी प्रकार वाळूज महानगर, तीसगाव परिसरात समोर आला आहे. नऊ जणांची ही टोळी कुणालाही न घाबरता इतक्या सहजतेने दरोडा टाकण्यासाठी वा चोरी करण्यासाठी जात असताना सीसीटीव्हीत कैद झाली; पण गंभीर म्हणजे, पोलिसांना याची साधी भणकही लागली नाही! एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिस ठाण्यांचे लिलाव होतात की काय, त्याची ‘वसुली’ करण्यासाठी गुंड-पुंडांना मोकळे रान दिले जाते का, पोलिस आणि गुन्हेगारांची ‘मिलिभगत’ तर नाही ना, असे प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत.