
Chhatrapati Sambhajinagar : विनापरवानगी रस्ता खोदाल तर गुन्हे
छत्रपती संभाजीनगर : पाईपलाईनद्वारे घरपोच गॅस पुरवठा करण्यासाठी शहरात लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार महापालिकेकडून परवानगी न घेता रस्त्यांची तोडफोड करत असल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार लक्षात येताच प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी यापुढे विनापरवानगी रस्ते खोदले तर थेट गुन्हा दाखल केला जाईल, अशी तंबी दिली आहे. विशेष म्हणजे घरोघरी गॅस पुरविण्याच्या कामासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड प्रयत्नशील असून, त्यांच्यासमोरच कंत्राटदाराला तंबी देण्यात आली.
शहराच्या काही भागात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. डॉ. कराड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र ही पाइपलाइन टाकण्यासाठी खोदले जाणारे रस्ते वादाचा विषय बनला आहे.
यापूर्वी कंत्राटदाराने महापालिकेकडे पैसे भरून रस्त्याच्या खोदकामासाठी परवानगी घेतली होती. मात्र पुढील कामासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. महापालिकेने आकारलेले शुल्क जास्त असल्याचा दावा देखील केला जात आहे.
दरम्यान शनिवारी (ता. चार) केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात विविध योजनांचा आढावा घेतला. त्यांनी शेवटी गॅस पाइपच्या कामाचा आढावाही घेतला व कामाला गती द्यावी अशी सूचना डॉ. कराड यांनी केली.
यावेळी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कोणालाही माहिती न देता रस्ते कसे काय खोदले? रस्ते खोदल्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे.
कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी खोदकाम केल्याचे निदर्शनास येत आहे. काम झाल्यानंतर फक्त माती टाकली जाते. त्यावर डॉ. चौधरी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.