
दिल्ली सरकारच्या धर्तीवर महापालिकेच्या शहरातील संपूर्ण ५० शाळा डिजिटल करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कार्पोरेशनने घेतला आहे.
Digital Education : नव्या वर्षात महापालिकेच्या शाळेत ‘डिजिटल शिक्षण’
छत्रपती संभाजीनगर - दिल्ली सरकारच्या धर्तीवर महापालिकेच्या शहरातील संपूर्ण ५० शाळा डिजिटल करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कार्पोरेशनने घेतला आहे. १५ ते २० शाळांमध्ये आता फळ्या ऐवजी डिजिटल स्क्रीन लावण्यात आले असून, विद्यार्थी नव्या वर्षापासून बाराखड्यांचे धडे डिजिटल स्क्रीनवर गिरवणार आहेत. १० वीपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम याच स्क्रिनवरून शिकविला जाणार आहे.
महापालिकेच्या शहरात ७१ शाळा असून, त्यात १७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. हे विद्यार्थी सर्वसामान्य घरातील असून, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात स्मार्ट सिटी अभिनयातून दिल्लीच्या धर्तीवर ५० शाळांचा कायापालट करण्यात निर्णय घेण्यात आला. दिल्ली सरकारने शाळांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे या शाळांची देशभर वाहवा झाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या शाळांची पाहणी केली व महापालिकेच्या ५० शाळांमध्ये ३५० डिजिटल वर्गखोल्या तयार करण्यासाठी ‘स्मार्ट एज्युकेशन उपक्रम हाती घेण्यात आला.
६५ कोटी रुपये खर्च करून महापालिका शाळांचा कायापालट केला जात आहे. त्यात सिव्हिल, डिजिटलायजेशन व फर्निचरच्या कामांचा समावेश आहे. सहा महिन्यापूर्वी गारखेडा शाळेत ट्रायल घेण्यात आले होते. त्यानंतर इतर भागातील १५ ते २० शाळांमध्ये सध्या हे काम सुरू झाले आहे. इंटरॲक्टीव्ह स्क्रीनवर पहिलीपासून ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम व्हीडीओ स्वरूपात दाखविला जाणार आहे. तसेच स्क्रिनवरूनच शिकविण्याची सोय आहे. मोबाईल थेट स्क्रिनला जोडण्याची सोय आहे, असे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान यांनी सांगितले.
अशा असतील सुविधा
५० शाळांमध्ये डिजिटल शिक्षणासोबतच इंटरनेट, वायफाय, सिसीटीव्ही, वॉटर कुलर अशा सुविधा असतील. जून २०२३ पर्यंत ही कामे पूर्ण होतील. तीन वर्षाचा देखभाल दुरुस्ती खर्च संबंधित कंत्राटदाराकडे आहे. या सोबतच दहा शाळांमध्ये सौर ऊर्जेचे पॅनल बसविले जाणार आहेत. डिजिटल वर्गखोल्यांसह शाळेसाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.
‘सीसीटीव्ही’मुळे शाळा बनल्या सुरक्षित
५० शाळा डिजिटल करण्यासोबतच या शाळाममध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळा सुरक्षित झाल्या आहेत. रात्रीच्यावेळी शाळेच्या परिसरात आंबडशौकीनांचा वावर वाढला होता. सीसीटीव्हीमुळे त्यांचा आपोआप बंदोबस्त झाला असल्याचे सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी सांगितले.