पाच शहरांपुरतीच उरली सेवा हवाई कनेक्टीव्हीटी!

पाच शहरांपुरतीच उरली सेवा हवाई कनेक्टीव्हीटी!
Published on: 
पाच शहरांपुरतीच उरली हवाई कनेक्टिव्हिटी नव्या शहरांची जोडणी होईना; २४ तासांत ७२ विमाने उतरण्याची क्षमता, प्रत्यक्षात उतरतात पाचच छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : अजिंठा-वेरूळचा जागतिक वारसा आणि वेगाने विकसित होणारे ऑरिक औद्योगिक क्षेत्र यामुळे देश-विदेशाचे लक्ष वेधणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळाची क्षमता मोठी आहे. पण, प्रत्यक्ष हवाई वाहतूक मात्र मर्यादित आहे. विमानतळावर २४ तासांत ७२ विमाने उतरू शकतात. पण, प्रत्यक्षात अवघी पाच विमाने येत आहेत. शिवाय मुंबई, नवी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर या पाच शहरांपुरताच हवाई संपर्क सुरू आहे. नवीन शहरांना जोडण्याऐवजी सुरू असलेल्या विमानफेऱ्याही कमी होत आहेत. अहमदाबाद, गोवा या सुरू असलेल्या सेवाही संपुष्टात आल्या. कोरोनापूर्वी १६ विमाने असलेली सेवा आता सहा विमानांवर आली. त्यामुळे उद्योग, पर्यटन आणि व्यावसायिक प्रवाशांची कोंडी होत आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयए), मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (मसिआ), औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ), छत्रपती संभाजीनगर (सीएसएन) फर्स्टसह विविध संघटनांकडून विविध मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यासाठी वारंवार मागणी होत आहे. येथील विमानतळावर धावपट्टी, अद्ययावत टर्मिनल आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध असतानाही विमान कंपन्यांकडून नवीन मार्ग सुरू करण्यासाठी अपेक्षित पुढाकार घेतला जात नाही. पूर्वी सुरू असलेल्या काही सेवा बंद झाल्या, तर काही मार्गांवरील फेऱ्यांची संख्या घटली आहे. परिणामी, प्रवाशांना मुंबई, पुणे किंवा शिर्डीसारख्या शहरांमार्गे पुढील प्रवास करावा लागत असून, वेळ आणि पैसाही खर्च होत आहे. --- इमिग्रेशनची प्रतीक्षा आणि अपेक्षा विमानतळाला आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क मिळवून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ऑरिक शेंद्रा आणि बिडकीनमध्ये परदेशी कंपन्यांचे प्रकल्प कार्यरत असून, भविष्यात आणखी मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आवश्यक असलेले इमिग्रेशन काउंटर आणि संबंधित यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. ही सुविधा सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. जपानसह आखाती देशांशी थेट संपर्क प्रस्थापित झाल्यास वाहन, औषधनिर्मिती आणि अन्य उद्योगांतील निर्यातदार, गुंतवणूकदार तसेच पर्यटकांना मोठा फायदा होईल. पण, आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी विमान कंपन्या किती पुढे येतील यावर ते अवलंबून असेल. --- पर्यटन क्षमतेच्या तुलनेत विमानसेवा तोकडी अजिंठा, वेरूळ, बीबी का मकबरा आणि देवगिरी किल्ला या ऐतिहासिक स्थळांना देश-विदेशातून पर्यटक भेट देतात. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रमुख पाच पर्यटनस्थळांवर ४२ लाखांहून अधिक देशांतर्गत पर्यटक भेटी आणि ५१ हजारांहून अधिक परदेशी पर्यटक भेटींची नोंद झाली. साधारण ३५ हजारांपर्यंत विदेशी नागरिक विविध कारणांनी शहरात येतात. एवढी मोठी पर्यटन क्षमता असतानाही देशातील प्रमुख पर्यटन शहरांशी थेट विमानसेवा मर्यादित आहे. --- उद्योगांची गरज; ‘उडान’ योजनेचाही लाभ नाही ऑरिक, शेंद्रा, बिडकीन, वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रांत देश-विदेशातील कंपन्यांची गुंतवणूक वाढत आहे. वाहन उद्योग, वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्रिक वाहने आणि उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांना देशातील प्रमुख औद्योगिक केंद्रांशी जलद संपर्काची आवश्यकता आहे. पुणे, चेन्नई आणि अहमदाबादसारख्या शहरांसाठी थेट विमानसेवा नसल्याने व्यावसायिक प्रवासात वेळ जातो. प्रादेशिक हवाई संपर्क वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘उडान’ योजनेचाही शहराला अपेक्षित लाभ मिळालेला नाही. --- विमानसेवांचा विस्तार करण्याचे आव्हान कायम २०२२-२३ मध्ये ४ लाख ६८ हजार ४८६ प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला होता. ही संख्या २०२३-२४ मध्ये ६ लाख २३ हजार ९१५, तर २०२४-२५ मध्ये ७ लाख ४०२ वर पोहोचली. तीन वर्षांत प्रवासी संख्येत सुमारे ४९.४ टक्के वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत विमानसेवांचा विस्तार करण्याचे आव्हान कायम आहे. थेट हवाई संपर्क वाढल्यास पर्यटकांचा प्रवास सुलभ होण्यासोबतच स्थानिक हॉटेल, वाहतूक, मार्गदर्शक आणि हस्तकला व्यवसायालाही चालना मिळू शकते. ----- दहा वर्षांत ४४७.८३ कोटींचा तोटा छत्रपती संभाजीनगर विमानतळाला आर्थिक वर्ष २०१५-१६ ते २०२४-२५ या दहा वर्षांत ४४७.८३ कोटी रुपयांचा एकत्रित आर्थिक तोटा झाला आहे. देशातील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तोट्यात असलेल्या ८१ एएआय-संचालित विमानतळांमध्ये तोट्याच्या रकमेनुसार संभाजीनगरच्या विमानतळाचा सातवा क्रमांक आहे. --- ही शहरे महत्त्वाची १. पुणे : उद्योग, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी. २. चेन्नई : वाहन उद्योग आणि औद्योगिक गुंतवणुकीसाठी. ३. अहमदाबाद : व्यापार आणि उद्योगासाठी. ४. कोलकाता : पूर्व भारताशी थेट संपर्कासाठी. ५. जयपूर आणि उदयपूर : पर्यटन सर्किट जोडण्यासाठी. ६. इंदूर : मध्य भारतातील व्यापार आणि पर्यटनासाठी. ७. वाराणसी : धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनासाठी. ८. मुंबई : सकाळ आणि संध्याकाळच्या अतिरिक्त फेऱ्यांसाठी. ९. जपान आणि आखाती देश : इमिग्रेशन सुविधा सुरू करून आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि कार्गो सेवेसाठी. --- (((कोट))) तासाला तीन विमाने जरी उतरली तरी ७२ विमाने विमानतळावर उतरू शकतात. सर्व सुविधायुक्त विमानतळ आहे. सध्याचे उपलब्ध मनुष्यबळ हे दोन शिफ्टचे आहे. त्यामुळे सकाळी सहा ते रात्री आठ ते दहा या वेळेत विमानतळावर दिवसाला ४० विमाने ये-जा करू शकतात. मागणी आणि क्षमता असल्याने काही महत्त्वाच्या शहरांत विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असून, दोन विमान कंपन्यांकडून येथे विमानसेवा सुरू आहे. - शरद येवले, संचालक, विमानतळ प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर -- दिल्ली-आग्रा-जयपूर हा पर्यटनाचा ‘गोल्डन ट्रँगल’ आहे. त्यातून पर्यटक आपल्याकडे वळवण्यासाठी राजस्थान, वाराणसी थेट एअर कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. त्याच्या अभावामुळे आपण पर्यटनाच्या विविध पॅकेजमधून बाहेर आहोत. टूर ऑपरेटर्सही पर्याय म्हणून छत्रपती संभाजीनगर ठेवतात; कारण कनेक्टिंग फ्लाइटने इथे येणे महागडे होते. ९९ टक्के विदेशी पर्यटक हे विमानाने येतात. त्यातही बहुतांश हे रेफरन्सने आलेले असतात. आपण मुख्य प्रवाहात येण्यासाठी हवाई कनेक्टिव्हिटी वाढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राजकीय पाठबळ कमी पडत आहे. - जसवंतसिंग राजपूत, अध्यक्ष, एटीडीएफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.