नियोजनबद्ध संभाजीनगर उभारणीची हीच वेळ
...
(((इंट्रो १)))
रसदीपसिंग चावला हे मंजीत कॉटन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असून, वर्ष १९९५ पासून कापूस उद्योगाशी संबंधित आहेत. मध्य प्रदेशपासून उद्योग प्रवास सुरू केल्यानंतर वर्ष २००३ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी उद्योग विस्तार केला. मराठवाड्यातील अनेक आधुनिक जिनिंग युनिट, हरित ऊर्जा प्रकल्प आणि रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांचे कार्य आहे. शहर विकास, पर्यटन, शाश्वत पायाभूत सुविधा आणि उद्योगवृद्धी या विषयांवर ते सातत्याने भूमिका मांडत असतात.
...
(((इंट्रो २)))
छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगाने वाढणारी औद्योगिक गुंतवणूक, अजिंठा-वेरूळसह लाभलेला समृद्ध पर्यटन वारसा आणि वाढती लोकसंख्या या तिन्हींचा विचार करून शहराच्या विकासाचे दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे. उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेऊन रस्ते, सार्वजनिक वाहतूक, टाऊनशिप, हरित क्षेत्रे, आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा विस्तार करावा लागेल. पर्यटनस्थळांचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग, शिर्डीला येणाऱ्या भाविकांना संभाजीनगरकडे वळविणे आणि उद्योगवाढीसाठी पूरक पायाभूत सुविधा उभारणे या माध्यमातून शहराला देशातील अग्रगण्य ‘टियर-२’ शहर बनविण्याची क्षमता आहे. त्यासाठी स्वतंत्र, आधुनिक आणि नियोजनबद्ध शहर उभारणीच्या दिशेने पावले उचलण्याची हीच वेळ आहे.
..
‘औद्योगिक गुंतवणूक, जागतिक दर्जाचा पर्यटन वारसा आणि वाढती लोकसंख्या या तिन्ही बाबींचा समतोल साधला, तर छत्रपती संभाजीनगर पुढील दशकात देशातील अग्रगण्य ‘टियर-२’ शहर म्हणून उदयास येऊ शकते, असा विश्वास मंजीत कॉटनचे संचालक रसदीपसिंग चावला यांनी व्यक्त केला. उद्योगांचा विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधांचा विस्तार अपेक्षित वेगाने झालेला दिसत नाही. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजनबद्ध शहर उभारण्याची हीच वेळ आहे’, असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.
उद्योगवाढीसोबतच पर्यटन, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध नागरी विस्ताराला समान प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगून चावला म्हणाले, की छत्रपती संभाजीनगरकडे अजिंठा-वेरूळ लेणी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, बीबी का मकबरा, पाणचक्की यांसारखा जागतिक दर्जाचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे. मात्र, या पर्यटनस्थळांची ज्या प्रमाणात ब्रँडिंग आणि तिथे सुविधा विकसित व्हायला हव्या होत्या, त्या झालेल्या नाहीत. विशेषतः अजिंठ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यटन हे केवळ स्थळांपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे माध्यम आहे. उद्योग रोजगार निर्माण करतात; मात्र पर्यटन हजारो छोट्या व्यावसायिकांना थेट व्यवसाय उपलब्ध करून देते. हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक, हस्तकला, मार्गदर्शक सेवा आणि स्थानिक बाजारपेठ या सर्व क्षेत्रांना पर्यटनामुळे मोठी संधी मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
..
शिर्डीला जाणारे भाविक शहराकडेही वळले पाहिजे
शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील उत्तम रस्ते संपर्काचा अधिक प्रभावी वापर करण्याची गरज आहे. शिर्डीला येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठा वर्ग अजिंठा, वेरूळ आणि घृष्णेश्वरकडे वळविण्यासाठी राज्य शासन, पर्यटन विभाग आणि उद्योग संघटनांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पार्किंग, वाहतूक आणि पर्यटक व्यवस्थापनाचे नियोजन आतापासून करणे गरजेचे असल्याचे चावला यांनी स्पष्ट केले.
----
सिडकोच्या धर्तीवर
हवी शहर रचना
शहर विकासाबाबत बोलताना त्यांनी २००३ मधील तत्कालीन औरंगाबाद आणि आजच्या छत्रपती संभाजीनगरची तुलना केली. दोन दशकांपूर्वी शहराची ओळख रुंद रस्ते, स्वच्छता आणि हिरवाई अशी होती. आता टोयोटासह विविध मोठ्या औद्योगिक प्रकल्पांमुळे लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नवीन लोक शहरात स्थायिक होतील. त्यामुळे नवीन रस्ते, नियोजनबद्ध टाऊनशिप, हरित क्षेत्र, शाळा, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांचे नियोजन आताच करणे आवश्यक आहे. सिडकोने विकसित केलेल्या वसाहतींच्या धर्तीवर आधुनिक, मोकळी आणि शाश्वत शहर रचना उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
..
घटती निर्यात मोठे आव्हान
यावेळी कापूस उद्योगातील बदलांचा आढावा घेत महाराष्ट्रातील ‘एमएच-१’ कापसाने जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे सांगत दर्जेदार उत्पादन, आधुनिक जिनिंग आणि ब्रँडिंगमुळे हा बदल शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, वाढलेली किमान आधारभूत किंमत, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि घटती निर्यात ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. शेतकऱ्यांना केवळ हमीभाव वाढविण्यापेक्षा उत्पादनवाढीसाठी दर्जेदार बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाची गरज आहे. ‘भाव अंतर योजना’ प्रभावीपणे राबविल्यास शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि उद्योगही अधिक स्पर्धात्मक बनेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
..
इतर शहरांकडून शिकण्याची हीच वेळ
छत्रपती संभाजीनगरकडे उद्योग, पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा यांचे दुर्मिळ असे त्रिसूत्री बळ आहे. अयोध्या, वाराणसी आणि तिरुपती ही शहरे एका धार्मिक स्थळामुळे प्रसिद्ध झाली; तर उज्जैनने महाकाल कॉरिडॉरमुळे पर्यटनात मोठी झेप घेतली. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरकडे अजिंठा-वेरूळ, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, बीबी का मकबरा अशी अनेक जागतिक दर्जाची आकर्षणे एकाच परिसरात आहेत. मात्र, या वारशाचे प्रभावी ब्रँडिंग, सुयोग्य नियोजन आणि आधुनिक सुविधा उभारणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. शिवाय मराठवाडा हा देशातील उत्कृष्ट कापूस उत्पादक प्रदेश असून छत्रपती संभाजीनगर आज ऑटोमोबाइल, ईव्ही, अभियांत्रिकी आणि शिक्षण क्षेत्रातही वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे उद्योगवाढीबरोबरच पर्यटन आणि नियोजनबद्ध शहर विकासावर भर दिल्यास संभाजीनगर देशातील आघाडीच्या ‘टियर-२’ शहरांमध्ये निश्चित स्थान मिळवू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.