मुकुंद भोगले : सकाळ संवाद दिवाळी अंक

मुकुंद भोगले : सकाळ संवाद दिवाळी अंक
Published on: 
रायझिंग मराठवाडा ः मुकुंद भोगले मुकुंद भोगले हे भोगले पेंटस् ॲण्ड कोटिंग्ज प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक असून छत्रपती संभाजीनगरातील ज्येष्ठ उद्योजक आहेत. त्यांच्या वडिलांनी १९६८ मध्ये स्थापन केलेला ‘निर्लेप’ हा भारतातील अग्रगण्य नॉनस्टिक कुकवेअर ब्रँड आहे. स्वदेशी तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण नवोन्मेषाच्या बळावर या ब्रँडने भारतीय ग्राहकांमध्ये विश्वासार्ह स्थान निर्माण केले. ही कंपनी आता ‘बजाज’ यांच्याकडे असून त्यांच्याकडून चालवण्यात येते. ---------- छत्रपती संभाजीनगर शहराने गेल्या सहा दशकांत महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या औद्योगिक नकाशावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. वाहन उद्योग, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती, इलेक्ट्रिकल उपकरणे, ग्राहक उत्पादने आणि आता इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील गुंतवणूक यामुळे शहराची ओळख देशातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांमध्ये होत आहे. शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) आणि विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे शहराचा औद्योगिक विस्तार सातत्याने वाढत आहे. या वाढीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, निर्यात वाढली आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाली. मात्र, या औद्योगिक प्रगतीच्या तुलनेत शहराचा नागरी विकास अपेक्षित गतीने झाला नाही. जागतिक दर्जाचे शहर घडविण्यासाठी औद्योगिक प्रगतीला शहराच्या सक्षम पायाभूत सुविधांची जोड द्यावीच लागेल, असे ठाम मत भोगले पेंट ॲण्ड कोटिंगचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद भोगले यांनी व्यक्त केले. ------------ उद्योगांची वाढ ही शहराच्या विकासाची सुरवात असते, शेवट नव्हे. एखाद्या शहरात उद्योग उभे राहिले म्हणजे त्या शहराचा सर्वांगीण विकास आपोआप होत नाही. उद्योगांसोबत मजबूत नागरी पायाभूत सुविधा, आधुनिक वाहतूक व्यवस्था, नियोजनबद्ध विस्तार, दर्जेदार आरोग्य व शिक्षण सुविधा, पर्यावरणपूरक विकास आणि नागरिकांना चांगले जीवनमान देणारी व्यवस्था उभी राहिली, तरच त्या शहराला खऱ्या अर्थाने विकसित म्हणता येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीची घोषणा झाली आहे. अँकर उद्योगांच्या आगमनामुळे सहायक उद्योग, लॉजिस्टिक्स, सेवा क्षेत्र आणि कौशल्याधारित रोजगार यांचाही विस्तार होत आहे. यामुळे शहराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची क्षमता निर्माण झाली आहे. परंतु, या औद्योगिक वाढीस पूरक अशा नागरी सुविधांचा विस्तार त्याच वेगाने झालेला दिसत नाही. वाढती वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक वाहतुकीतील मर्यादा, काही भागांतील पाणीपुरवठ्याच्या समस्या आणि शहराच्या उत्तर-दक्षिण भागांना जोडणाऱ्या सक्षम वाहतूक व्यवस्थेचा अभाव हे प्रश्न आजही कायम आहेत, असे भोगले यांनी नमूद केले. -------- ईज ऑफ लिव्हिंगही महत्त्वाचे कोणताही उद्योग केवळ कारखान्यापुरता मर्यादित नसतो. त्याच्यासोबत हजारो कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञ, पुरवठादार, व्यावसायिक आणि त्यांची कुटुंबे शहरात येतात. त्यांना चांगल्या दर्जाच्या शाळा, रुग्णालये, निवास व्यवस्था, सार्वजनिक उद्याने, सांस्कृतिक वातावरण आणि सुरक्षित नागरी सुविधा अपेक्षित असतात. ही जीवनशैली उपलब्ध झाली तरच उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ शहरात टिकून राहते. त्यामुळे ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ इतका ‘ईज ऑफ लिव्हिंग’ हाही औद्योगिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. शहराकडे मोठ्या औद्योगिक संधी आल्या, अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर झाल्या, विकास आराखडे तयार झाले. मात्र, त्यांची अंमलबजावणी सातत्याने आणि दूरदृष्टीने झाली नाही. शहराच्या वाढीकडे दीर्घकालीन दृष्टीने पाहण्याऐवजी अनेकदा अल्पकालीन उपाययोजनांवर भर दिला गेला. परिणामी, उद्योगांची वाढ आणि शहराचा विकास यांच्यात तफावत निर्माण झाली. ही दरी भरून काढण्यासाठी ठोस राजकीय नेतृत्व, सक्षम प्रशासन आणि सातत्यपूर्ण धोरणांची गरज असल्याचे भोगले यांनी नमूद केले. -- आदर्श औद्योगिक शहर बनण्याची संधी छत्रपती संभाजीनगरसमोर आज महाराष्ट्रातील आदर्श औद्योगिक शहर बनण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी शहराच्या नियोजनात पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करावा लागेल. वाढती लोकसंख्या, नव्या औद्योगिक वसाहती, वाढणारी वाहनसंख्या आणि बदलणाऱ्या नागरी गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा विकसित कराव्या लागतील. रस्त्यांचे रुंदीकरण, रिंग रोड, सार्वजनिक वाहतूक, स्मार्ट पार्किंग, जलव्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि आधुनिक नागरी नियोजन यांना आता प्राधान्य द्यावे लागेल. उद्योगांनी केवळ उत्पादन आणि नफा यापुरते मर्यादित न राहता शहराच्या विकासातही सक्रीय भूमिका घ्यावी. उद्योग आणि समाज यांच्यातील नाते अधिक मजबूत झाले, तर विकासाची प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते. यासाठी उद्योग, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आवश्यक आहे. शहराच्या विकासात पर्यावरण आणि वारसा संवर्धन यांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. संभाजीनगरचा ऐतिहासिक वारसा, जलसंपदा, हरित क्षेत्रे आणि सांस्कृतिक ओळख जपत विकास करणे ही भविष्यातील मोठी जबाबदारी आहे. आधुनिक विकासाच्या नावाखाली शहराचा इतिहास आणि पर्यावरण यांची उपेक्षा होऊ नये. विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखणारे नियोजनच शहराला शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. --------------------- नियोजन प्रक्रियेत हवा सर्वांचा सहभाग शहर विकास हा केवळ शासनाचा विषय नाही. नागरिकांनीही नियोजन प्रक्रियेत सहभाग घेणे, सार्वजनिक सुविधांचा जबाबदारीने वापर करणे, पर्यावरण संरक्षणात योगदान देणे आणि विकासाच्या प्रश्नांवर सकारात्मक दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. विकसित शहरांची उदाहरणे पाहिली तर तेथे शासन आणि नागरिक यांचा सहभाग समान असल्याचे दिसून येते, असेही त्यांनी स्पष्ट केले. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com