Chhatrapati Sambhajinagar Tourism: पर्यटनाच्या राजधानीत इतिहासाचे साक्षीदार भग्नावस्थेत, पर्यटनवाढीसाठी काय केलं पाहिजे ?

महाराष्ट्रात दरवर्षी देशभरातून सुमारे चार कोटींपेक्षा जास्त आणि परदेशांतून सुमारे २० लाखांपेक्षा जास्त पर्यटक येतात. त्यापैकी दीड कोटीपेक्षा जास्त पर्यटक अजिंठा आणि वेरूळला भेट देतात.
Chhatrapati Sambhajinagar main tourism place history
Chhatrapati Sambhajinagar main tourism place historysakal

छत्रपती संभाजीनगर - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराची ओळख आहे. जिल्ह्यात अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद लेण्या या प्रमुख लेण्यांसह बीबी-का-मकबरा, दौलताबाद किल्ला, पाणचक्की ही ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत. वेरूळ येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे.

याशिवाय इतर दोन ठिकाणी लेण्या आणि ७ किल्लेही आहेत. पण, त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, प्रमुख पर्यटनस्थळे वगळता आडवळणाला असलेले हे इतिहासाचे साक्षीदार आज भग्नावस्थेत आहेत. त्यांच्याकडे लक्ष दिल्यास जिल्ह्यात येणारे पर्यटक जास्त दिवस राहतील. ग्रामीण भागातही रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

महाराष्ट्रात दरवर्षी देशभरातून सुमारे चार कोटींपेक्षा जास्त आणि परदेशांतून सुमारे २० लाखांपेक्षा जास्त पर्यटक येतात. त्यापैकी दीड कोटीपेक्षा जास्त पर्यटक अजिंठा आणि वेरूळला भेट देतात. अजिंठा, वेरूळसारख्या जागतिक दर्जाचा वारसा लाभलेल्या आणि पर्यटनाची राजधानी म्हणून कायमच गौरविल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यटकांचा मुक्काम मात्र सरासरी केवळ दीड दिवसाचाच आहे.

देशातील १२ आयकॉनिक साइट्‌समध्ये अजिंठा आणि वेरूळचा समावेश करण्यात आला. पण, याशिवाय इतर अनेक काही पर्यटनस्थळे जिल्ह्यात आहेत. त्यांची माहिती देश-विदेशात पोचवली तर पर्यटकांचा मुक्काम वाढेल. शिवाय अजिंठा लेण्याकडे जाणारा रस्त्याचा दर्जा व्यवस्थित नाही. वेरूळकडे जाणाऱ्या रस्त्यावरही काही ठिकाणी वाहतूक ठप्प होते. या समस्या सोडविणेही गरजेचे आहे.

हव्या जागतिक दर्जाच्या सुविधा

विदेशी पर्यटकांना हवे असलेले अन्न पर्यटनस्थळांभोवती सहज उपलब्ध होईल, अशी योजना आखून हॉटेल व्यावसायिकांना त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. इटालियन, कॉन्टिनेण्टल, मेक्‍सिकन असो वा चायनीज; भारतीय अन्नाच्या जोडीला सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ पर्यटकांना मिळाले पाहिजेत. पर्यटकांसाठी नाइटलाइफचाही त्या दृष्टीने विचार व्हायला हरकत नाही.

कोट्यवधी रुपये खर्चून पर्यटक सुविधा केंद्रे उभारण्यात आली खरी. पण, पर्यटकांना तिथे समाधानकारक सुविधा नाही. पर्यटनस्थळांच्या तिकिटांची ऑनलाइन बुकिंग, जवळच्या हॉटेल्स, विमानतळ आणि दळणवळणाच्या साधनांची माहिती इंटरनेटवर सहजासहजी मिळाली, तर पर्यटकांचा ओढा वाढू शकेल.

या स्थळांचीही हवी ब्रॅडिंग

ऐतिहासिक गेट, नहर-ए-अंबरीसोबत इतर नहरी, थत्ते हौद, सलीम अली सरोवर, खंडोबा मंदिर (सातारा), घृष्णेश्‍वर मंदिर (वेरूळ), भद्रा मारोती मंदिर, हजरत जर जर जरी बक्ष दर्गा (खुलताबाद), नाथ मंदिर, शहागंज घड्याळ, हिमरू शालू, शहरातील खाद्य संस्कृती, शहरातील वस्तुसंग्रहालय, हिमायतबाग, दिवाण देवडी, ऐतिहासिक चबुतरे, शहानूरमिया दर्गा, वेरूळ गढी, शहरातील ऐतिहासिक महल यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांसोबत येथे पर्यटनस्थळ म्हणून ब्रँडिंगची गरज आहे.

या ठिकाणी लेण्या

१) अजिंठा लेणी (ता. सिल्लोड)

२) वेरूळ लेणी (ता. खुलताबाद)

३) औरंगाबाद लेणी (विद्यापीठ परिसर छत्रपती संभाजीनगर)

४) पितळखोरा लेणी (ता. कन्नड)

५) घटोत्कच लेणी जंजाळा (ता. सोयगाव)

जिल्ह्यातील किल्ले

१) दौलताबाद (दौलताबाद)

२) अंतूर किल्ला (ता. कन्नड)

३) बैतालवाडी किल्ला (ता. सोयगाव)

४) लहूगड नांद्रा (ता. फुलंब्री)

५) तालतम किल्ला (ता. सोयगाव)

७) भांगसीमाता गडकिल्ला (ता. छत्रपती संभाजीनगर)

८) सुतोंडा किल्ला (ता. सोयगाव)

पर्यटनवाढीसाठी काय करायला हवे?

  • अजिंठा लेणीकडे जाणारा रस्ता चांगला आणि वाहतूक कोंडीमुक्त हवा

  • वेरूळच्या चौकात ट्रॅफिक जाम होते. तिथे नियोजन हवे

  • बीबी-का-मकबरा ते औरंगाबाद लेणी रस्ता दर्जेदार हवा

  • धार्मिक स्थळांच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे

  • पाणचक्कीत चांगल्या सुविधा हव्या

  • शहरातील ऐतिहासिक गेट व्हावे पर्यटनस्थळे

  • टाउन हॉल ते मकाईगेट रस्त्याची दुरुस्ती करावी. रोज हजारो पर्यटक इथून घाणीतून जातात.

  • पैठण रस्त्याची दुरवस्था झाली. रस्त्याचे चौपदरीकरण आवश्‍यक

  • देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणांचा विळखा काढावा

  • छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलचे दर मुंबई-पुण्यापेक्षा कमी असावेत

  • रिक्षा, टॅक्सीचालकांना ड्रेसकोड, नियमावली हवी

  • विमानतळ, पर्यटन अधिकाऱ्यांच्या कामाचे ॲनालिसिस हवे

  • स्थानिक संस्कृती, परंपरा, वैशिष्ट्यांची माहिती लोककलेच्या माध्यमातून देणे गरजेचे

  • पर्यटनासाठी कार्य करणाऱ्यांनी कमाईतील काही भाग विकासासाठी खर्च करावा

  • ग्रीन, स्पोर्ट टुरिझमला चालना मिळावी

  • ट्रेकिंगमध्ये निसर्ग, कृषी टुरिझमला प्राधान्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com