
Chhatrapati sambhajinagar : पार्किंग धोरणच तळ्यात-मळ्यात!
छत्रपती संभाजीनगर : बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने अनेक वर्षाच्या चर्चेनंतर पार्किंग धोरण तयार केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर सात ठिकाणी पे-ॲण्ड पार्क सुरू करून पार्किंगला शिस्त लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता, पण सातपैकी फक्त दोनच ठिकाणी आत्तापर्यंत पे-ॲण्ड पार्क सुरू झाले आहे.
याठिकाणी देखील वाहनचालकांच्या विरोधाला कंत्राटदाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पार्किंग धोरणाच्या श्रीगणेशालाच गालबोट लागले असून, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा त्रास राहणारच आहे.
शहरासाठीच्या पार्किंग धोरणावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. गेल्या काही महिन्यात अभ्यास करून पार्किंग धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर शहरातील सात ठिकाणी पार्किंग पॉलिसी राबविण्याचा निर्णय झाला. त्यात कॅनॉट प्लेस, जिल्हा न्यायालयाची विरुद्ध बाजू, पुंडलिक नगर, टीव्ही सेंटर, निराला बाजार आणि सूतगिरणी चौक या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी पार्किंग झोन,
नो पार्किंग झोन आणि फ्री पार्किंग झोन अशी मार्किंग केली जाणार होती, पण जिल्हा न्यायालयाची विरुद्ध बाजू व कॅनॉट गार्डन परिसरातच पे ॲण्ड पार्क सुरू झाले. संबंधित कंत्राटदाराला या दोन्ही ठिकाणी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा न्यायालयाच्या शेजारी असलेल्या पार्किंगच्या जागेवरून निर्माण झालेला अद्याप शमलेला नाही.
दुसरीकडे कॅनॉट परिसरात येणारे नागरिक कंत्राटदाराला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पार्किंग धोरणाचे सध्याचे चित्र तळ्यात, मळ्यात असेच आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख चौकातील वाहतुकीची कोंडी व त्यातून वाट काढताना वाहनचालकांची कसरत कायम आहे.
नव्या रस्त्यांत अंमलबजावणी होणार का?
पार्किंग धोरणात शहरात नव्याने रस्त्यांची कामे करताना पार्किंगविषयी काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिका सध्या १०० कोटी रुपये खर्चून ६५ रस्त्यांची कामे करणार आहे. यातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंग धोरणाची अंमलबजावणी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ॲपला मिळतोय अल्प प्रतिसाद
कर्बलेट या संस्थेने शहरातील पार्किंगविषयी मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपचा उपयोग करून नागरिक त्यांचे वाहन पार्क करण्यासाठी स्वत:च जागा निवडू शकणार आहेत, पण सध्या या ॲपला देखील अल्प प्रतिसाद मिळत आले. पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे वाहतूक कोंडीसारख्या समस्या टाळता येणे शक्य होईल, प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल असे मानले जात आहे, पण पार्किंग धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.
बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई शहराच्या ठरावीक भागातच होते. जालना रोड वगळता इतर भागात पोलिस फिरकतही नाहीत. त्यामुळे सिडको-हडको, गारखेडा, गजानन महाराज मंदिर रोड, शहानूरमियॉं दर्गा रोडसह इतर मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी कायम आहे. तसेच मुख्य बाजारपेठेत वन-वेची देखील अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.