पर्यटन संचालनालय वृक्षलागवडीत अव्वल
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाकडून २४ हजार वृक्षारोपण
छत्रपती संभाजीनगर, ता. ७ ः राज्यातील ३०० कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध शासकीय विभागांना दिलेल्या वृक्षलागवड उद्दिष्टाच्या पूर्ततेत पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
विभागाला २० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते, या निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे २४ हजार २०० वृक्षांची लागवड करून अव्वल क्रमांक पटकावला आहे.
‘हरित महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत वर्ष २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्षलागवड तसेच त्यानुषंगिक पायाभूत सुविधांच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी विविध विभागांना उद्दिष्टे निश्चित केली आहेत. जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठका घेण्यात आली. त्यावेळी सादर केलेल्या अहवालानुसार १ सप्टेंबर २०२६ पर्यंत पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक विभागाने २४,२०० वृक्षलागवड केली असून, निर्धारित २० हजारांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत १२१ टक्के कामगिरी नोंदवली. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा तब्बल ४,२०० अधिक वृक्षलागवड केली आहे. वृक्षलागवडीच्या माध्यमातून पर्यटनस्थळांचे सौंदर्य वाढविणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भविष्यातील पर्यटन विकासाला हरित अधिष्ठान देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
--
((कोट))
आम्हाला हरित महाराष्ट्र आयोग जिल्हा संनियंत्रण समितीच्या वतीने २० हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यात पर्यटन विभागाने हे उद्दिष्ट वेळेवर पूर्ण करत २४ हजार २०० वृक्षलागवड करून शासनाच्या अमृतवृक्ष ॲपवर शंभर टक्के अपलोड करण्यात आले. याची वन विभाग व जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली आहे.
- विजय जाधव, पर्यटन उपसंचालक, प्रादेशिक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
---