Chhatrapati Sambhajinagar : गरिबांनो...गुन्हा नोंदवायचाय? वर्षभर झिजवा उंबरे!

बँकेतून पैसे गेल्याच्या फिर्यादीसाठी सुरक्षा रक्षकाच्या तीन पोलिस ठाण्याला चकरा
chhatrapati sambhajinagar why police file case after one year cyber crime marathi news
chhatrapati sambhajinagar why police file case after one year cyber crime marathi newsesakal

छत्रपती संभाजीनगर : एका सुरक्षा रक्षकाच्या खात्यातून दोन लाख २५ हजार रुपये गायब झाल्यानंतर केवळ गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना तीन-तीन पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवावे लागले. मग गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी एक वर्ष लावले. वरिष्ठांचा आदेश असूनही हर्सूल पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने फिर्यादीला पोलिस ठाण्यांचे उंबरे झिजवावे लागल्याचा प्रकार समोर आला.

अखेर बेगमपुरा पोलिसांनी तब्बल एक वर्षानंतर गुन्हा दाखल करून घेतला. मंजीतराव भीमराव अंभोरे (३७, रा. भारतमातानगर, एन-१३, हडको) असे त्या फिर्यादी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

मंजीतराव अंभोरे यांच्या फिर्यादीनुसार ते सुरक्षारक्षक आहेत. ते बेगमपुरा हद्दीत राहतात. ४ ऑगष्ट २०२२ रोजी त्यांना एक फोन आला. दरम्यान समोरून मी एका बॅंकेतून बोलत आहे. तुमच्या खात्यातून पैसे कपात झाल्यास आम्हाला कळवा, असे सांगण्यात आले.

त्यावर फिर्यादीने ‘फ्रॉड कॉल’ समजून कट केला. त्यांनी मोबाईलमध्ये खाते तपासले असता, खात्यातून जवळपास सव्वादोन लाख रुपये कपात झाल्याचे समोर आले. त्यावर हर्सूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बॅंकेत जाऊन त्यांनी विचारणा केली. त्यानंतर बॅंकेने त्यांना खाते होल्ड करून दिले.

अशी झाली परवड

फिर्यादी अंभोरे यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले असता, त्यांना सायबर पोलिसांनी प्रकरणात रोहनकुमार बबन सिंग (रा. बहादूरपूर, समस्तीपूर, बिहार) याच्या खात्यावर एक लाख ९९ हजार ९९९ रुपये आणि बिरेंद्रकुमार नावाच्या ‘एसबीआय‘ खात्यात २५ हजार रुपये गेल्याचे फिर्यादीला सांगत हे प्रकरण बेगमपुरा पोलिस ठाण्यामध्ये वर्ग केले.

घर बेगमपुरा, तर बॅंक हर्सूल हद्दीत म्हणून...

बेगमपुरा पोलिसांनी फिर्यादीची संपूर्ण माहिती घेतली. त्यानुसार फिर्यादी घरी असते, त्यावेळेस त्यांना खात्यातून पैसे कपात झाल्याचा तसेच फसवणुकीची लिंक आली असती आणि त्यावेळेस हा प्रकार घडला असता, तर बेगमपुरा हद्द येते.

मात्र, असे न होता थेट खात्यातून पैसे कपात झाल्याची तक्रार असल्याने आणि सदर बॅंक हर्सूल ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने फिर्यादीला तत्कालीन उपनिरीक्षक यांनी सहायक आयुक्त तसेच पोलिस उपायुक्त यांच्याशी योग्य तो पत्रव्यवहार साधत हर्सूलला पाठविले.

पोलिस उपायुक्तांनी हर्सूल पोलिसांना सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यासंदर्भात कळविले. परंतु हर्सूल पोलिसांनी फिर्यादीला पुन्हा बेगमपूरा ठाण्यातच पाठविले. अखेर बेगमपुरा पोलिसांनी मोठेपणा दाखवत हा गुन्हा दाखल करून घेतला. असे असले तरी वरिष्ठांचा आदेश हर्सूल पोलिसांनी पायदळी तुडवत सुरक्षारक्षकाला का फिरविले, हा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे करत आहेत.

फिर्यादीचा गुन्हाच दाखल झाला नसता, तर ती गोष्ट वेगळी होती. हे जुने प्रकरण आहे. नेमका काय अर्ज आहे, हे बघून उद्या कळवतो.

- प्रशांत पोतदार, पोलिस निरीक्षक, हर्सूल ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com