बालकामगार निर्मूलनासाठी चित्रकला, निबंध स्पर्धा

बालकामगार निर्मूलनासाठी चित्रकला, निबंध स्पर्धा
Published on
बालकामगार निर्मूलनासाठी चित्रकला, निबंध स्पर्धा सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ९ : बालकामगार निर्मूलनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांनी केले आहे. प्रत्येक शाळेने चित्रकला व निबंध स्पर्धेसाठी प्रत्येकी कमाल १० विद्यार्थ्यांची नावे २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यालयास पाठवावीत. विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव, मुख्याध्यापक अथवा शिक्षकांचा भ्रमणध्वनी क्रमांक, पालकांचा क्रमांक आणि उपलब्ध असल्यास विद्यार्थ्याचा क्रमांक द्यावा. माहिती ८०८०४७२१९०, ९७६७६०१३१८, ८९७५९७६९४९ या क्रमांकांवर किंवा aclnanded@gmail.com या ई-मेलवर पाठविता येईल. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बालकामगार मुक्त भारत, मला शाळेत जायचे आहे, कामावर नाही, बालपण वाचवा, शिक्षणाचा अधिकार, बालमजुरीला नकार,माझे बालपण, माझे स्वप्न आदी विषयांवर चित्रकला स्पर्धा होईल. निबंधासाठी ‘बालकामगार निर्मूलनाची गरज’, ‘बालकामगार : कारणे, परिणाम आणि उपाययोजना’ ‘बालकामगार मुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची भूमिका’, ‘बालहक्क आणि बालकामगार निर्मूलन’ तसेच मुलांच्या हातात पुस्तक हवे कामाचे साधन नाही’ हे विषय देण्यात आले आहेत. तालुकास्तरीय स्पर्धेनंतर प्रत्येक तालुक्यातून चित्रकला व निबंधातील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होईल. त्यातून चित्रकलेचे ४८ व निबंधाचे ४८, असे एकूण ९६ विद्यार्थी अंतिम स्पर्धेत सहभागी होतील. जिल्हास्तरावर दोन्ही प्रकारांतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या सहा विजेत्यांना बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. बालपण हे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांसाठी असते. मुलांच्या हातात कामाचे साधन नव्हे, तर पुस्तक असावे, हा संदेश विद्यार्थ्यांच्या चित्रातून व लेखणीतून समाजापर्यंत पोहोचविणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. शाळांनी स्पर्धेपुरता सहभाग न ठेवता बालकामगार निर्मूलनाच्या जनजागृतीत सक्रिय भूमिका बजावावी, असे ढवळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com