विकास आराखड्यात रस्त्याशिवाय नाही आरक्षण!

विकास आराखड्यात रस्त्याशिवाय नाही आरक्षण!
Published on: 
‘डीपी’ प्लॅनमध्ये रस्त्यांशिवाय नाही आरक्षण -- सीएमआरडीएचा निर्णय; वर्षभरात येणार आराखडा -- छत्रपती संभाजीनगर, ता. ९ : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (सीएमआरडीए) हद्दीतील ३४३ गावांसाठी तयार होत असलेल्या विकास आराखड्यात (डीपी प्लॅन) खासगी जमिनींवर केवळ रस्त्यांचेच आरक्षण टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मैदान, शाळा, उद्यान यांसारखी इतर सर्व सार्वजनिक आरक्षणे मात्र शासकीय जमिनींवरच टाकली जाणार असल्याचे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले. शहरासह परिसराचा झपाट्याने विकास होत असून, मोठ्या संख्येने नामांकित कंपन्या औद्योगिक क्षेत्रात येत आहेत. डीएमआयसीसाठी संपादन केलेल्या १० हजार एकर क्षेत्रातील जागा उद्योगांसाठी अपुऱ्या पडत असल्याने, आता तिसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली. याच पार्श्वभूमीवर, शहरासोबतच ग्रामीण भागाचाही सुनियोजित विकास व्हावा, यासाठी सात तालुक्यांतील ३४३ गावांचा समावेश करून ‘सीएमआरडीए’ची स्थापना करण्यात आली. सीएमआरडीएच्या नियोजनबद्ध विकासासाठी १४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आराखडा तयार करण्यासाठी पीएमसीची (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट) नेमणूक करण्यात आली. आराखड्यात गावांमधील दळणवळण सुकर करण्यासाठी रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. --- ‘ॲमिनिटीज’च्या जागांचा होईल फायदा प्राधिकरणातील खासगी ले-आऊटला मंजुरी देताना नियमांनुसार १० टक्के जागा सार्वजनिक सुविधांसाठी (ॲमिनिटीज) आरक्षित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या जागांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना घेता येईल, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले. --- (((कोट))) आगामी वर्षभरात विकास आराखडा तयार होईल. त्यात खासगी जमिनींवर रस्त्यांचे आरक्षण टाकताना संबंधित मालकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. शिवाय जमीन मालकांना त्यांच्या जागेचा विकास करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. आराखड्यात खासगी भूखंडांवर केवळ रस्त्यांचे आरक्षण राहणार असून, विविध सुविधांसाठी शासकीय जमिनींचा वापर केला जाईल. यात शाळा, महाविद्यालये, दवाखाने, मैदाने, उद्याने, बाजारपेठा, व्यापारी संकुले, बसस्थानक, स्मशानभूमी, अग्निशमन केंद्र, पोलिस ठाणे, एमएसईबी सबस्टेशन व शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक असणाऱ्या आरक्षणांचा समावेश असेल. - जी. श्रीकांत, विभागीय आयुक्त ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.