‘इंटरनेटच्या युगातही
अंधश्रद्धा चिंताजनक’
धाराशिव, ता. १ ः तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या आधुनिक युगातही समाज मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याचे चित्र चिंताजनक आहे. यासाठी देश घडवणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले.
धाराशिव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष सिद्धेश्वर बेलूरे, विजय गायकवाड, उत्तरेश्वर बिराजदार, ज्येष्ठ कार्यकर्ते अब्दुल लतीफ, राजेंद्र धावारे आदी उपस्थित होते.
बनसोडे म्हणाले, की डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी लढा दिला. त्यांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी समाजातील सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन चळवळ अधिक व्यापक केली पाहिजे. डॉ. दाभोळकर यांच्या स्वप्नातील शोषणाविरुद्धचा आणि विवेकवादी भारत साकारण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे. अंबाजोगाई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समविचारी संघटनांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.