महाप्रसादासाठी व्यावसायिक
गॅस सिलिंडरचाच वापर करा
-----
लातूर, ता. १६ : गणेशोत्सव आणि येणाऱ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये विविध मंडळांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद व भोजनासाठी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. घरगुती सिलिंडरचा गैरवापर रोखण्यासाठी आणि संभाव्य भीषण अपघात टाळण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी याबाबतचे निर्देश दिले.
अनेक गणेश मंडळे महाप्रसाद तयार करताना घरगुती सिलिंडरचा वापर करतात. यावर प्रशासनाने काही धोके स्पष्ट केले आहेत. घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या बर्नर आणि गॅस प्रेशरमध्ये मोठा फरक असतो. भंडारखान्यात मोठ्या भांड्यांसाठी घरगुती सिलिंडर वापरल्यास भीषण अपघात घडून जीवितहानी होऊ शकते. दुर्देवाने अपघात घडल्यास घरगुती सिलिंडरचा बेकायदेशीर वापर झाल्याचे सिद्ध झाल्यास कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण मिळत नाही. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक किंवा सार्वजनिक कामासाठी वापर करणे हा ‘जीवनावश्यक वस्तू कायद्या’नुसार गुन्हा आहे. अपघात झाल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात, याकडे विभागाने लक्ष वेधले आहे.
ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोळंके म्हणाले, की गणेशोत्सव हा आपला पवित्र आणि आनंदाचा सण आहे, परंतु महाप्रसाद तयार करताना सुरक्षेशी अजिबात तडजोड केली जाऊ नये. घरगुती सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरची क्षमता तसेच बर्नरच्या प्रेशरमध्ये मोठा फरक असतो. मोठ्या भांड्यांसाठी घरगुती सिलेंडर वापरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. जिल्हा प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेत हा कडक निर्णय लागू केला आहे. कायदा आणि सुरक्षेचे पालन करत केवळ व्यावसायिक सिलिंडरचाच वापर करावा, जेणेकरून उत्सव प्रत्येकासाठी सुरक्षित आणि आनंदाचा ठरेल.