LTR03HTP03.jpg
लातूर ः पोलिस आपल्या गावात या उपक्रमाअंतर्गत शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पोलिस अधिकारी.
------------
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिस आपल्या गावात’
-
दोन दिवसांत २० गावांना भेटी; शेतकऱ्यांशी साधला संवाद
--
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ३ ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या सामाजिक व इतर विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ता. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ हा विशेष कम्युनिटी पोलिसिंग उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात वीस गावांना भेटी देत पोलिसांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी व कर्मचारी थेट गावांमध्ये जाऊन शेतकरी, नागरिक, महिला, युवक तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. दुष्काळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या विविध सामाजिक समस्या, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच भविष्यातील संभाव्य अडचणींबाबत नागरिकांशी चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
उपक्रमाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण २० गावांना भेटी देण्यात आल्या आहेत. यावेळी संबंधित गावातील शेतकरी व नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
किनगाव पोलिस ठाणे हद्दीतील कोळवाडी, मोळवण, हिंगणगाव, गोडाळा, सारोळा व खलंगरी या गावांना भेटी देण्यात आल्या. अहमदपूर पोलिस ठाणे हद्दीतील शिरूर ताजबंद व थोरलेवाडी, देवणी पोलिस ठाणे हद्दीतील विळेगाव, कासार शिरशी पोलिस ठाणे हद्दीतील कोराळी, रायलिंग व मुदगड, वाढवणा पोलिस ठाणे हद्दीतील वाढवणा बुद्रुक, चाकूर पोलिस ठाणे हद्दीतील चापोली व हुडगेवाडी, शिरूर अनंतपाळ पोलिस ठाणे हद्दीतील शिरूर अनंतपाळ व येरोळ, निलंगा पोलिस ठाणे हद्दीतील जाऊ व सावंगीरा, भादा पोलिस ठाणे हद्दीतील काळमाथा तसेच मुरुड पोलिस ठाणे हद्दीतील भोसा या गावांना भेट देण्यात आली.
----------
उपक्रमाच्या केंद्रस्थानी शेतकरी
यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नैसर्गिक व सामाजिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी हा उपक्रम शेतकरी व नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येत आहे. संभाव्य समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्याबाबत आवश्यक पूर्वकाळजी घेणे, गावपातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणांमध्ये समन्वय वाढविणे आणि सामूहिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.