पाणी जपून वापरण्यासाठी जनजागृती करा
--
पालकमंत्री झिरवाळ यांच्या जिल्हा प्रशासनास सूचना
------------
हिंगोली, ता. १८ : एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली असून, या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी कालावधीत संभाव्य पाणी, चारा टंचाईच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करा. प्रत्येक गावागावांत पाणी वापराच्या काटकसरीबाबत व्यापकप्रमाणात जनजागृती करा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनास केल्या.
पालकमंत्री झिरवाळ यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पाणी, चारा आदींचा आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पूर्णा पाटबंधारे विभाग वसमतचे कार्यकारी अभियंता आर. पी. गरुड, जिल्हा जलसंधारण अधिकारी सोनाली ढोके, मुख्याधिकारी प्रांजली मुंडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे राजू नरवाडे, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर कचकलवार उपस्थित होते.
पालकमंत्री झिरवाळ म्हणाले, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत प्राधान्यक्रमाने व नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करावे. पिण्याच्या पाण्याची सुनिश्चितता करून योग्य ती अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील उपलब्ध जलसाठ्याचे २०२६-२७ या वर्षातील धरणनिहाय, वापरनिहाय पाणी वापर नियोजन निकषांनुसार अंतिम करावे.
---
आपत्कालीन पाणीसाठा राखीव ठेवा
प्रत्येक प्रमुख जलाशयाच्या उपलब्ध जिवंत साठ्यापैकी १० टक्के अतिरिक्त बफर, आपत्कालीन साठा राखून ठेवणे, नागरी, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पाणी वापरात १० टक्के कपात करणे, गळती प्रतिबंधक मोहीम राबविणे, सांडपाणी पुनर्वापर, औद्योगिक वापरासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर, पिण्याचे पाणी, औद्योगिक आरक्षणानंतर शिल्लक पाण्यानुसार रब्बी हंगामी पिके, चारा पिकांसाठी सिंचन पाळी, आर्वतनाचे वेळापत्रक निश्चित करणे आदी बाबींचाही आढावा पालकमंत्री झिरवाळ यांनी घेतला.