बांधकाम कामगारांना पाच हजार
सानुग्रह अनुदान देण्याची मागणी
-----------
छत्रपती संभाजीनगर, ता. २१ ः राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, परिस्थिती सामान्य होईपर्यंत पात्र बांधकाम कामगारांना प्रतिमहा ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महासंघाचे अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी केली.
या संदर्भातील निवेदन महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांना देण्यात आले. निवेदनाचा आशय असा ः दुष्काळामुळे अनेक भागांतील बांधकामे ठप्प होत आहेत. बांधकाम कामगार हा पूर्णपणे रोजंदारीवर अवलंबून असतो. बांधकामे बंद पडल्यास थेट कामगारांसोबतच वाळू, विटा, स्टील, सिमेंट, मालवाहतूक आणि इतर पूरक क्षेत्रांशी निगडित असलेल्या हजारो कामगारांच्या हाताला काम उरणार नाही. परिणामी, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवण्याची शक्यता असल्याने शासनाने सामाजिक बांधिलकीतून तत्काळ आर्थिक साहाय्य जाहीर करावे.
-
प्रमुख मागण्या
राज्यातील सर्व पात्र नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगारांना दुष्काळ संपेपर्यंत प्रतिमहा ५ हजार सानुग्रह अनुदान द्यावे. दुष्काळामुळे रोजगार गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबांसाठी अतिरिक्त सामाजिक सुरक्षेच्या विशेष उपाययोजना राबवाव्यात. या योजनेबाबत तातडीने अधिकृत शासन निर्णय काढून त्याची पारदर्शक अंमलबजावणी सुरू करावी. १८ ऑक्टोबरपर्यंत शासनाने याबाबत ठोस व सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला.