घरकुल अभियंत्यांचे मानधन
सहा महिन्यांपासून थकले!
-------------
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २३ : जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या ११७ कंत्राटी अभियंत्यांचे मागील सहा महिन्यांपासून मानधन थकले आहे. मानधनाअभावी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न या अभियंत्यांसमोर निर्माण झाला आहे. थकीत मानधन तातडीने मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यातील शंभरहून अधिक कंत्राटी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांची भेट घेतली.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये हे अभियंते अनेक वर्षांपासून ग्रामीण घरकुल योजनांच्या कामकाजासाठी कार्यरत आहेत. घरकुल लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, बांधकामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे आणि योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणे, अशी कामे त्यांच्याकडून केली जातात. या अभियंत्यांची नियुक्ती डीजी ग्राम या कंपनीमार्फत बाह्य यंत्रणेद्वारे करण्यात आली आहे. मात्र, मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने अभियंत्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमित काम करूनही मानधन वेळेवर मिळत नसल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि इतर दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मानधनाअभावी आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शंभरहून अधिक कंत्राटी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
यावेळी महेश पाटील यांनी संबंधित अभियंत्यांना दिवाळीपूर्वी मानधन मिळेल, असे आश्वासन दिले. त्यामुळे थकीत मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अभियंत्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
----