रस्ते १५ टक्के कमी दराने करण्याची कंत्राटदाराची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Contractor build roads at 15 percent discount Smart City aurangabad

रस्ते १५ टक्के कमी दराने करण्याची कंत्राटदाराची तयारी

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानातून शहरातील १०८ रस्त्यांची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यात पहिल्या निविदेत ११ टक्के तर दुसऱ्या व तिसऱ्या निविदेत १५ टक्के कमी दराने कामे करण्याची तयारी एकाच कंत्राटदाराने दर्शवली आहे. एकाच कंत्राटदाराला संपूर्ण कामे मिळणार असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील उर्वरित रस्त्यांसाठी महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. पण शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असल्याने अखेर १११ रस्ते स्मार्ट सिटीच्या निधीतून करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला.

त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने १०८ रस्त्यांच्या कामांसाठी तीन निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. आता या निविदा उघडण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दोन निविदांतील रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी तीन, तर तिसऱ्या निविदेसाठी चार जणांनी निविदा दाखल केल्या आहेत. एकाच कंत्राटदाराकडे रस्त्यांची कामे दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात फेज-१ साठी ए.जी. कन्स्ट्रक्शनने ११ टक्के सर्वांत कमी दराने निविदा दाखल केली आहे. त्यापाठोपाठ कल्याण टोल इन्फ्रास्टक्चर कंपनीने व राजेंद्रसिंग भांबू इन्फ्रास्टक्चर कंपनीने अनुक्रमे ३.८५ व ०.०१ टक्के कमी दराने निविदा भरल्या आहेत. फेज-२ साठी ए.जी. कन्स्ट्रक्शनने १५ टक्के कमी दराने निविदा दाखल केल्या आहेत तर विक्रम इन्फ्रास्टक्चर कंपनीने ७.०२ टक्के कमी दराने, राजेंद्रसिंग भांबू इन्फ्रास्टक्चर कंपनीने ०.०१ टक्के कमी दराने निविदा भरल्या आहेत.

फेज-३ साठी चार निविदा प्राप्त झाल्या असून, त्यात ए.जी. कन्स्ट्रक्शनने सर्वाधिक १५ टक्के कमी दर दिला आहे. पवार-पाटकर कन्स्ट्रक्शनने १०.३५ टक्के कमी दराने, राजेंद्रसिंग भांबू इन्फ्रास्टक्चरने ०.०१ टक्के कमी दराने आणि श्री. सत्यसाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने ५.१३ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ए.जी. कन्स्ट्रक्शन या एकाच कंपनीकडे कामे जाणार आहेत.

मध्य मतदारसंघात ४४ कामे

सर्वाधिक रस्ते हे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातील आहेत. ४४ रस्त्यांचा समावेश असून, १२३ कोटी ८७ लाख रुपये खर्च होणार आहेत. तसेच शिवसेनेचे पश्‍चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील २७ रस्त्यांवर ११९.१३ कोटींचा खर्च होणार आहे.

पूर्वमध्ये २७ रस्ते

भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघातील २७ रस्त्यांचा समावेश असून, ७० कोटींचा खर्च होणार आहे. फुलंब्री मतदारसंघातील पण शहरात येणाऱ्या भागातील तीन रस्त्यांचा समावेश असून, ४.२३ कोटींचा खर्च होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Contractor Build Roads At 15 Percent Discount Smart City Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..