कोट्यवधींची बिले थकली; कंत्राटदारांचे ''फोन करो''आंदोलन

कोट्यवधींची बिले थकली; कंत्राटदारांचे ''फोन करो''आंदोलन
Published on: 
कंत्राटदारांचे ‘फोन करो’ आंदोलन ----------- कोट्यवधींची बिले थकल्याने शासनाला विचारला जाब -------------- हिंगोली, ता. ३१ : जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध रस्त्यांची कामे पूर्ण करूनही कोट्यवधी रुपयांची देयके अनेक महिन्यांपासून रखडली आहेत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील कंत्राटदारांनी शुक्रवारी (ता. ३०) अनोखे ‘फोन करो’ आंदोलन केले. या आंदोलनातून संबंधित मंत्र्यांना थेट दूरध्वनी करून प्रलंबित बिलांबाबत जाब विचारला. जल जीवन मिशनच्या माध्यमातून गावोगावी पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात आली आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते व अन्य विकासकामेही पूर्ण झाली आहेत. मात्र, कामे पूर्ण होऊनही कंत्राटदारांना मोबदला मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कामांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, साहित्य पुरवठादारांची देणी, मजुरांचे वेतन आणि वाढते व्याज यांचा भार कंत्राटदारांना सहन करावा लागत आहे. स्वतःच्या खिशातून खर्च भागविण्याची वेळ आल्याने नव्या कामांमध्ये गुंतवणूक करणेही कठीण झाले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही थकीत बिलांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने कंत्राटदारांनी थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. आंदोलनादरम्यान संबंधित विभागांचे मंत्री, सचिव तसेच खासगी सचिवांना फोन करून देयकांच्या विलंबाबाबत माहिती देण्यात आली. हिंगोली येथील कंत्राटदार निश्चल यंबल यांनी आंदोलनात पुढाकार घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी थकीत बिले, निधी वितरणातील विलंब आणि कंत्राटदारांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाची व्यथा मांडली. ---------- ‘निधी वितरणाचे वेळापत्रक द्या’ पूर्ण झालेल्या कामांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत, विकासकामांसाठी नियमित निधी उपलब्ध करून द्यावा आणि निधी वितरणाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.