शंभर कोटींतून होणार सहकार संकुल
क्रांती चौकात उभारणार, सहकार विभाग एकाच छताखाली
छत्रपती संभाजीनगर, ता. ३१ ः छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती असलेल्या क्रांती चौक परिसरात १०० कोटी रुपयांचा ‘सहकार संकुल’ प्रकल्प आता प्रत्यक्षात येणार आहे. प्रशासकीय कामकाजाला गती देणारा आणि सहकार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत.
येथे सहकार संकुल उभारण्याचा निर्णय राज्याच्या पूरक अर्थसंकल्पातही नोंदविण्यात आला होता. सहकार विभागाच्या विविध इमारतींसाठी निधीची तरतूद करण्याची प्रक्रिया त्यातून पुढे आली. क्रांती चौक उड्डाणपुलाजवळ सहकार विभागाचे कार्यालय पूर्वीपासून कार्यरत आहे. याच परिसरात आधुनिक आणि प्रशस्त संकुल उभारण्याची संकल्पना काही वर्षांपूर्वी पुढे आली होती. दोन एकर जागेवर संकुल उभारण्याचा प्रस्तावही यापूर्वी चर्चेत होता.
नवीन संकुलात जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक, विशेष लेखापरीक्षक तसेच सहकार विभागाशी संबंधित अन्य कार्यालये एकत्र येणार आहेत. नागरिक आणि सहकारी संस्थांच्या कामांसाठी सुनावणी सभागृह, नोंदणी कक्ष, कार्यालयीन कक्ष, भांडार व्यवस्था यांसारख्या सुविधा यामध्ये असणार आहे. तसेच दिव्यांगांसाठी प्रशासकीय उतारमार्ग आणि चार उद्वाहकांचीही तरतूद केली आहे. संकुलात अतिथीगृह आणि प्रशिक्षणासाठी स्वतंत्र सभागृहाची सुविधाही राहणार असून त्यामुळे सहकार विभागाच्या बैठका, प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होईल. कार्यालयीन सुविधांसोबत निवासाची व्यवस्था असल्याने बाहेरून येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही सोय होणार आहे.
दरम्यान, रेशीम विभागाशी संबंधित पायाभूत सुविधांचाही या शासकीय बांधकाम नियोजनात समावेश केला आहे. रेशीम विभागाचे प्रादेशिक कार्यालय सध्या चिकलठाणा परिसरात कार्यरत आहे. क्रांती चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने संकुल सुरू झाल्यानंतर वाहनतळ, प्रवेशमार्ग आणि वाहतूक नियोजनाला विशेष महत्त्व राहणार आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक व सहकारी संस्थांचे प्रतिनिधी ये-जा करणार असल्याने बांधकामासोबत या बाबींचे नियोजन आवश्यक ठरणार आहे.
-
((कोट))
सहकार संकुलाची रचना आधुनिक प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन करण्यात येत आहे. कार्यालयीन कामकाज, प्रशिक्षण, नागरिकांच्या सुविधा आणि निवासव्यवस्था यांचा समन्वय साधला जात आहे. बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि निर्धारित कालावधीत काम पूर्ण करण्यावर विभागाने विशेष भर दिला आहे.
- एस.एस. भगत, अधीक्षक अभियंता, छत्रपती संभाजीनगर विभाग
-------