कापूस वेचण्यावरून वाद; दहा जणांविरुद्ध गुन्हा
----
मानवत, ता. १९ (बातमीदार) : शेतातील कापूस वेचण्यावरून तसेच जमीन मालकीच्या वादातून शेतकरी कुटुंबाला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना मानवत तालुक्यातील भोसा गावाजवळ रविवारी (ता. १५) दुपारी घडली होती. याप्रकरणी चौघांसह अन्य सहा अनोळखींविरुद्ध मानवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
कुशावर्ता प्रल्हाद जाधव (रा. भोसा, ता. मानवत) या आपल्या पती, दीर व सासू यांच्यासह शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास शेजारील शेतातील काही व्यक्ती काठ्या घेऊन त्यांच्या शेतात आल्या व जमीन नावावर नसल्याच्या मुद्द्यावरून फिर्यादीच्या पतीशी वाद घातला. त्यानंतर बालासाहेब दिगंबरराव पवार यांनी काठीने फिर्यादीच्या दिराच्या हातावर व पतीच्या पाठीत मारले. तसेच अन्य आरोपींनीही फिर्यादी, त्यांचे पती व दिराला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच कापूस वेचणे बंद करा, अन्यथा ठार मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यावरून बालासाहेब दत्तराव पवार, दत्तराव तातेराव पवार, मदन शिवाजी जाधव व शुभम मदन जाधव (सर्व रा. भोसा, ता. मानवत) यांच्यासह अन्य सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.