कापूस पऱ्हाट्यांचे व्यवस्थापन करा; जमिनीची सुपीकता वाढवा!

कापूस पऱ्हाट्यांचे व्यवस्थापन करा; जमिनीची सुपीकता वाढवा!
Published on: 
कपाशीच्या पऱ्हाट्यांचे व्यवस्थापन करा; जमिनीची सुपीकता वाढवा! कॉटन श्रेडरसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन; जिल्ह्यासाठी ११४ युनिटचे उद्दिष्ट ----------- नांदेड, ता. २९ : कापूस वेचणीनंतर शेतात उरणाऱ्या पऱ्हाट्यांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे ‘कापूस क्रांती’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी जिल्ह्याला कॉटन श्रेडर या कृषी यंत्राचे ११४ युनिटचे उद्दिष्ट दिले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कापूस उत्पादक व ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी द.रा. कळसाईत यांनी केले. नांदेड जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर कपशीची लागवड केली आहे. कापूस वेचणीनंतर शेतात राहणाऱ्या पऱ्हाट्यांचे योग्य व्यवस्थापन करून कॉटन श्रेडरच्या सहाय्याने या पऱ्हाट्यांचे बारीक तुकडे करून ते जमिनीत मिसळून जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढण्यास, अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यास आणि पुढील हंगामासाठी शेत तयार करण्यास मदत होते. या यंत्राच्या वापरातून एक एकर म्हणजेच ०.४० हेक्टर कपाशी क्षेत्रातील अडीच ते तीन टन जैवभार जमिनीत मिसळण्यास मदत होते. यामुळे पीक अवशेषांचे व्यवस्थापन सुलभ होण्यासोबतच कृषी कामांतील वेळ व श्रमाची बचत होते. कमाल ७५ हजारांपर्यंत अनुदान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या मंजूर किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील, बहुभूधारक शेतकऱ्यांना मंजूर किमतीच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार रुपये अनुदान मिळेल. निर्धारित टक्केवारीनुसार मिळणारी रक्कम आणि कमाल अनुदान मर्यादा यांपैकी कमी रक्कम ग्राह्य धरली जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी सेतू सुविधा केंद्रामार्फत किंवा उपलब्ध सुविधेनुसार महाडीबीटी पोर्टलवर (https://mahadbt.maharashtra.gov.in/) ऑनलाइन अर्ज सादर करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com