((कायद्याची भाषा))
------
कोर्टातील तारीख म्हणजे नेमके काय? प्रत्येक सुनावणीला काय घडते?
---
न्यायालयीन कामकाजात ‘तारीख पडली’, ‘पुढची तारीख मिळाली’ किंवा ‘सुनावणी पुढे ढकलली’ असे शब्द वारंवार ऐकायला मिळतात. मात्र, न्यायालयाने दिलेली प्रत्येक तारीख म्हणजे प्रत्यक्ष सुनावणी किंवा निकालाची वेळ असतेच असे नाही. न्यायालयीन प्रक्रियेत प्रत्येक तारखेला वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्व असते.
-----
तारीख म्हणजे काय?
एखाद्या प्रकरणाची सुनावणी, कागदपत्रांची पूर्तता, पक्षकारांची उपस्थिती, युक्तिवाद किंवा अन्य न्यायालयीन कार्यवाही करण्यासाठी न्यायालयाने निश्चित केलेला दिवस म्हणजे त्या प्रकरणाची तारीख होय. प्रकरणाच्या स्वरूपानुसार आणि त्या दिवशीच्या कामकाजानुसार पुढील न्यायालयाची कार्यवाही ठरते.
----
प्रत्येक तारखेला काय घडते?
न्यायालय प्रकरणाच्या सुरवातीच्या टप्प्यात न्यायालय संबंधित अर्ज किंवा तक्रारीची दखल घेते. आवश्यक असल्यास समोरच्या पक्षाला नोटीस बजावली जाते. त्यानंतर संबंधित पक्षकारांचे म्हणणे, लेखी उत्तर आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली जातात. काही प्रकरणांत पुरावे नोंदवले जातात, साक्षीदारांची तपासणी होते आणि उलट तपासणी केली जाते. त्यानंतर दोन्ही बाजूंचे वकील आपापले युक्तिवाद करतात. न्यायालयाला आवश्यक वाटल्यास अतिरिक्त कागदपत्रे मागवली जाऊ शकतात किंवा एखाद्या मुद्द्यावर स्पष्टीकरण घेतले जाऊ शकते. काहीवेळा वकिलांची अनुपस्थिती, कागदपत्रांची अपूर्णता, साक्षीदार उपस्थित नसणे किंवा अन्य आवश्यक कारणांमुळे पुढील तारीख दिली जाते. मात्र, प्रत्येक प्रकरणात तारीख पुढे जाण्याचे कारण सारखेच असेल असे नाही. काही प्रकरणांत एकाच दिवशी महत्त्वाची कार्यवाहीही पूर्ण होऊ शकते.
----
निकाल प्रत्येक तारखेला लागतो का?
निकाल प्रत्येक तारखेला लागतो असे नाही. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आणि प्रकरण निर्णयासाठी तयार झाल्यावर न्यायालय निकाल देऊ शकते. काही प्रकरणांत निकाल राखून ठेवला जातो आणि नंतर स्वतंत्र दिवशी जाहीर केला जातो. त्यामुळे केवळ पुढील तारीख मिळाली म्हणजे न्याय मिळण्यास विलंब होत आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. प्रकरणाची सद्यःस्थिती, न्यायालयीन आदेश आणि पुढील कार्यवाही समजून घेणे महत्त्वाचे आहे. न्यायालयातील प्रत्येक तारीख ही न्यायप्रक्रियेतील एक पायरी असते. त्या दिवशी नेमकी कोणती कार्यवाही झाली, हे जाणून घेण्यासाठी संबंधित प्रकरणाचा न्यायालयीन आदेश तपासणे आवश्यक आहे. तसेच दिवाणी, फौजदारी आणि इतर प्रकारच्या प्रकरणांमध्ये प्रक्रिया वेगवेगळी असू शकते. त्यामुळे विशिष्ट प्रकरणातील कार्यवाही समजून घेताना संबंधित न्यायालयाचा आदेश अंतिम संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे.
- अनिल जमधडे
९९२२०३४५००