न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आज
काळ्या फिती लावून आंदोलन
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ : समान काम, समान वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील तब्बल ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असून, बुधवारी (ता. १६) काळ्या फिती लावून कर्मचारी काम करणार आहेत. चार टप्प्यांत हे आंदोलन होणार असून, गुरुवारी (ता. १७) बेमुदत संपावर जाण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालय व खंडपीठातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शासनाकडून शासन निर्णय काढण्यास होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने सुधारित वेतनश्रेणीसह प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा औरंगाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार दांडगे यांनी दिला. पहिल्या टप्प्यात बुधवारी काळ्या फिती लावून काम केले जाईल, त्यानंतर पुढील महिन्यात १६ आणि १७ ऑक्टोबर असे दोन दिवस काळ्या फिती लावून काम केले जाणार आहे. त्यानंतर ५ नोव्हेंबरला सामूहिक रजा आंदोलन केले जाणार असून, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला.