esakal | हृदयद्रावक! कोरोनाने घेतला आई अन् शिक्षक मुलाचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

हृदयद्रावक! कोरोनाने घेतला आई अन् शिक्षक मुलाचा बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विहामांडवा (औरंगाबाद): कोरोना महामारीत अनेकांनी जवळची माणसे गमावली. अशीच धक्कादायक घटना पैठणमधील विहामांडव्यात घडली आहे. अवघ्या पाच दिवसांत आई आणि शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुलाचा कोरोनाने बळी घेतला. विहामांडव्यातील उमेश नांदरे हे पाचोडजवळील थेरगाव येथील विद्यालयात शिक्षक होते. गेल्या आठवड्यात उमेश नांदरे यांच्या आई आणि रेणुकादेवी शरद कारखान्याच्या माजी संचालिका कौशल्याबाई (५९) यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी नेवासा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, घरातील अन्य सदस्यांची तपासणी केल्यानंतर शिक्षक उमेश नांदरे (३३) पॉझिटिव्ह आले. उपचार सुरू असलेल्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले. कुटुंबावर दु:ख असतानाच दुसरीकडे औरंगाबादेत एका खासगी रुग्णालयात उमेश नांदरे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर शनिवारी (ता.पाच) त्यांचाही मृत्यू झाला.

हेही वाचा: बियाणांसाठी शेतकऱ्यांनी चक्क दुकानासमोर काढली रात्र जागून

दोन वर्षांपूर्वी आठ वर्षांची मुलगी गेली

दोन वर्षांपूर्वी शिक्षक उमेश नांदरे यांच्या आठ वर्षांच्या मुलीचे अल्प आजाराने निधन झाले होते. त्या दुःखातून नांदरे कुटुंब सावरत नाही तोच कोरोनाची वक्रदृष्टी त्यांच्या आईवर पडली. ताराई शिक्षण संस्था पैठण संचलित त्रिंबकदासजी पटेल उच्च माध्यमिक विद्यालय थेरगाव येथे कार्यरत असलेले उमेश नांदरे यांचेही या आजाराने निधन झाले. वर्ष २००९ पासून या शाळेत विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत सामाजिक बांधिलकी जोपासली होती.

असा कर्तबगार शिक्षक संस्थेस मिळणे दुरापास्त आहे, असे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री अनिल पटेल यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले. संस्थेच्या सचिव रंजना पाटीदार, निमेश पटेल, उपाध्यक्ष सुभाष पटेल, मनोहर घायाळ, बापूसाहेब गोजरे, अरुण तांबे, दिलीप सनवे, प्राचार्य गणेश तांबे आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.