बोगस डॉक्टर घेताहेत रूग्णांचा जीव...

फुलंब्रीत समित्या कागदावरच ; ग्रामीण भागात होतेय जनतेची लूट
crime news aurangabad fake doctor killing people robbed in rural areas
crime news aurangabad fake doctor killing people robbed in rural areassakal

फुलंब्री : कोरोनामुळे तालुक्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतलेली होती. त्याचा फायदा ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांनी उचलला. विशेषतः अशिक्षित जनतेचा गैरफायदा घेत या बोगस डॉक्टरांनी कोरोना काळात आपली पोळी भाजून घेतली. आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाने सर्व तालुक्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्यासाठी नियुक्त असलेली समिती केवळ कागदावरच असल्याचे दिसून येऊ लागले आहे. परिणामी अनेक निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

तालुक्यात आरोग्य सेवा न पोहोचलेल्या दुर्गम भागात प्रामुख्याने या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. बनावट डिग्रीच्या आधारे तात्पुरता दवाखाना सुरू करून स्वस्तात उपचार करण्याचे आमिष त्यांच्याकडून दाखविले जाते. सर्दी, खोकला, तापावर औषधी दुकानात मिळणाऱ्या गोळ्या औषधांचा वापर करून या डॉक्टरांकडून उपचार केला जातो. त्यात रोगाचे निदान होत नसल्याने अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे.

बोगस डॉक्टरकडून कोणत्याही आजारावर एकच उपचार पद्धत सुरू असल्याने किरकोळ आजारी असलेले रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्य विभागाकडून या बोगस डॉक्टरांवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

तक्रार कोणाकडे करायची

साधारणत: ग्रामीण भागातच बोगस डॉक्टर कार्यरत असतात. अशा वेळी गावपातळीवरील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे त्याबाबतची तक्रार करता येऊ शकते किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार करता येईल.

तालुका समितीत कोण असते?

बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी तालुका पातळीवर समित्या गठित करण्यात आल्या असून त्याचे प्रमुख तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. या समितीत गटविकास अधिकारी, तहसीलदार, सरपंच, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांचा समावेश आहे.

अशी केली जाते चौकशी

बोगस डॉक्टरांबाबत आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार प्राप्त झाल्यास त्याची खातरजमा करण्यासाठी सदरची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविली जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची खात्री झाल्यास संबंधित बोगस डॉक्टरला नोटीस देऊन त्याच्याकडील वैद्यकीय पात्र कागदपत्रांची मागणी केली जाते. मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित डॉक्टरविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाते.

बोगस डॉक्टरांना टक्केवारी

तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या बोगस डॉक्टरांशी शहरातील पदवी प्राप्त असलेले डॉक्टर हातमिळवणी करीत रुग्ण रेफर करण्यासाठी बोगस डॉक्टरांना होणाऱ्या बिलात टक्केवारी देतात. त्याचबरोबर विविध ठिकाणी सहलीचे आयोजन शहरातील विविध हॉस्पिटल मार्फत केले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील बोगस डॉक्टर संबंधित रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये रेफर करतात. रुग्णाला सुट्टी झाल्यानंतर संबंधित डॉक्टरांना त्याचा मोबदला मिळून जातो.

तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा पुढील आठवड्यामध्ये सर्वे केला जाणार आहे. या तपासणीमध्ये वैद्यकिय शिक्षणाची कागदपत्रे नसलेल्या संबधीत डॉक्टरवर कायदेशीर कार्यवाही करून तसा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.

- डॉ. प्रसन्ना भाले,तालुका आरोग्य अधिकारी फुलंब्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com