दोन वर्षांचा पीकविमा मिळणार कधी?
गतवर्षी अतिवृष्टी, यंदा दुष्काळ; शेतकऱ्यांचा विमा संरक्षणावर सवाल
-----
निलंगा, ता. ४ (बातमीदार) : गतवर्षीच्या अतिवृष्टीने आणि यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, दोन्ही खरीप हंगामांचा पीकविमा अद्याप मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. मोठ्या प्रमाणात विमा हप्ता भरूनही प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळत नसेल, तर पीकविमा काढण्याचा उपयोग काय, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पूर्वी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत एक रुपयात विमा भरण्याची सुविधा होती. मात्र, ही योजना बंद करण्यात आली. त्यानंतर २०२५-२६ पासून योजनेत बदल करण्यात आले. पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले. कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा ऐच्छिक करण्यात आला आहे.
निलंगा तालुक्यात गतवर्षी एक लाख २५ हजार ८५१ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला होता. त्यांनी सात कोटी ९३ लाख ३६ हजार ४६० रुपयांचा विमा हप्ता भरला. यंदाच्या खरीप हंगामात एक लाख सहा हजार ३३२ शेतकऱ्यांनी ६६ हजार ९५८ हेक्टर क्षेत्रासाठी विमा उतरवला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सात कोटी ६८ लाख रुपये भरले आहेत. मात्र, या विम्याची भरपाई मिळणार का, याबाबत अनिश्चितता आहे.
-----
निकष शिथिल करण्याची मागणी
गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, तर यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी दोन्ही वर्षांचा पीकविमा मिळण्याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कापणी प्रयोग आणि महसूल विभागाच्या सर्वेक्षणावर आधारित विमा मंजुरीचे निकष शिथिल करावेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.