((मेन)) (फोटो देणार आहे))
..........................
पिके करपली, कर्ज फेडायचे कसे?
पावसाची दडी, हलक्या जमिनीतील उत्पादनावर पाणी
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १ ः पीककर्जाचा आधार घेऊन खरीप साधल्यास कर्ज फेडून चार पैसे हातात राहतील, या अपेक्षेने पावसाच्या भरवशावर पेरणी केली. पण, पावसाने महिनाभराचा मोठा खंड दिल्याने पिके हातची जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत. चार पैसे हाती राहायचे सोडाच केलेला खर्च सुद्धा वाया जाण्याची बिकट स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पीककर्ज फेडायचे कसे आणि संसाराचा गाडा हाकायचा कसा, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध बँकांनी रविवारपर्यंत (ता. ३०) ६६ हजार ६८२ शेतकऱ्यांना ६८८ कोटी ३० लाख रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे. जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ४३.१४ टक्के आहे.
बँकनिहाय कर्जवाटपाचा लेखाजोखा
जिल्ह्यातील बँकांसाठी यंदाच्या खरीप हंगामात १ हजार ५९५ कोटी ४३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले गेले. त्यापैकी ६८ हजार ४५६ खात्यांचे कर्ज मंजूर झाले. प्रत्यक्षात ६६ हजार ८६२ खात्यांमध्ये रकमेचे वितरण झाले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेची उल्लेखनीय कामगिरी
पीककर्ज वितरणात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने उत्कृष्ट कामगिरी करीत आपल्या ३०३ कोटी १२ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ७२.७३ टक्के कर्जवाटप पूर्ण केले आहे. त्या खालोखाल जिल्हा बँकेने ५४.२५ टक्के उद्दिष्ट गाठले आहे.
.......
((चौकट))
बँकेचा प्रकार...उद्दिष्ट...प्रत्यक्ष वाटप...लाभार्थी...उद्दिष्टपूर्ती टक्के
महाराष्ट्र ग्रामीण बँक...३०३ कोटी १२ लाख...२२० कोटी ४६ लाख...१९,०४९...७२.७३
जिल्हा बँक...२९५ कोटी ७८ लाख...१६० कोटी ४७ लाख...३२,९६२...५४.२५
व्यावसायिक बँका...९९६ कोटी ५३ लाख...३०७ कोटी ३७ लाख...१५,५४८...३०.८४
खासगी बँका...६२ कोटी ७५ लाख...२४ कोटी ८६ लाख...७४९...३९.६१
एकूण...१,५९५ कोटी ४३ लाख...६८८ कोटी ३० लाख...६६,६८२...४३.१४
.......................
((चौकट))
पाऊस गायब, पिके सुकली
धाराशिव हा प्रामुख्याने शेतीवर आणि त्यातही सोयाबीनवर अवलंबून असलेला जिल्हा आहे. शेतीतून उत्पन्न हंगामाच्या शेवटी मिळते, मात्र खर्चाची सुरवात पेरणीपूर्वीच होते. अशा वेळी शेतकऱ्यांनी पीककर्जाचा आधार घेतला आहे. मात्र, जिल्ह्यात शिवारंच्या शिवारं सुकलेली, तसेच करपलेली दिसू लागली आहेत. काही ठिकाणी पीक थोडेफार हिरवे दिसत असले तरी फुले गळून गेली आहेत. पाण्याचा मोठा ताण पडल्याने लागलेल्या शेंगातील दाणे भरणार नाहीत. त्यामुळे मोठे संकट ओढवल्याची स्थिती आहे.