पिकांचे अवशेष औद्योगिक वापरासाठी देण्यास बंदी
कुटार, भुसा, काड, भुसकट, उसाचे पाचट जिल्ह्याबाहेर नेण्यासही निर्बंध
-----
लातूर, ता. १८ : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी, जनावरांसाठी चारा आणि वैरणीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. आगामी काळात चारा टंचाईचे संकट गंभीर होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी पिकांचे अवशेष औद्योगिक इंधन म्हणून वापरण्यास बंदी घातली आहे. तसेच जिल्ह्यातील चारा, वैरण आणि पिकांचे अवशेष जिल्ह्याबाहेर विक्रीसाठी नेण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
सोयाबीनचे कुटार, ज्वारी व मक्याचा कडबा, गव्हाचे काड, हरभरा व तुरीचा भुसा, उसाचे पाचट आणि उसाचा चोथा हे पशुधनासाठी उपयुक्त चारा स्रोत आहेत. मात्र, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील बायोकोल, बायोमास प्रकल्प, वीटभट्ट्या आणि अन्य कारखान्यांमध्ये हे अवशेष इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर खरेदी करून वापरले जात आहेत. त्यांचा औद्योगिक वापर वाढल्यास जनावरांसाठी चारा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुधनाचे संरक्षण आणि चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
-----
चारा वाहतूक, विक्रीवरही निर्बंध
लातूर जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांमधील गुरांचा चारा, हिरवा व वाळलेला चारा, वैरण, गवत, कडबा आणि पिकांचे अवशेष जिल्ह्याच्या महसुली सीमा ओलांडून अन्य जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर नेण्यास, विक्री करण्यास तसेच वाहनांद्वारे वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चारा जिल्ह्यातील पशुधनासाठी राखून ठेवणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.