
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मराठी शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. राज्यातील अनेक जुन्या शाळा इमारतींना आज ४० ते ५० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. शाळा अत्यंत जीर्णावस्थेत पोचल्या आहेत. भिंतींना भेगा, छप्पर गळके, खिडक्या-दारे तुटलेली, पावसाळ्यात पाणी साचलेले अशा धोकादायक परिस्थितीत जीव मुठीत धरून शिक्षक अध्यापन, तर विद्यार्थी अध्ययन करत आहेत. तरीही या दुरवस्थेकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे.