सायबर सुरक्षा, राष्ट्रीय एकता रॅली
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ३१ ः जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय येथे शनिवारी (ता.३१) ‘सायबर सुरक्षा जनजागृती रॅली’ आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता रॅली’चे आयोजन करण्यात आले.
पोलिस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. या जनजागृती मोहिमेत पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस मुख्यालय, धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण व आनंदनगर येथील अधिकारी आणि अंमलदार तसेच धाराशिव शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीत सहभागी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षेचा संदेश देणारे विशेष टी-शर्ट परिधान केले होते. तसेच सायबर सुरक्षा व राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे डिजिटल बॅनर्स आणि फलक लोकांचे विशेष आकर्षण ठरले. रॅलीच्या अग्रभागी मेगाफोनच्या माध्यमातून नागरिकांना सायबर गुन्हेगारी, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय आणि घ्यावयाच्या काळजीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
केवळ धाराशिव शहरातच नव्हे, तर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी या रॅलींचे आयोजन करून सायबर सुरक्षा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश घराघरांपर्यंत पोहोचवण्यात आला.
......
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नागरिकांनी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सावधानता बाळगावी, कोणत्याही अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नये आणि सायबर फसवणुकीची कोणतीही घटना घडल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन याप्रसंगी पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.
......
धाराशिव ः जिल्हा पोलिस दलाच्या वतीने शनिवारी शहरात आयोजित ‘सायबर सुरक्षा जनजागृती रॅली’मध्ये सहभागी झालेले पोलिस अधिकारी, कर्मचारी आदी.
फोटो क्रमांक ःOSM26B07306