दहिफळमध्ये पाण्याच्या
टाकीवर चढून आंदोलन
गौर, ता. ३ ः मराठा आरक्षणाच्या तीव्र मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कळंब तालुक्यातील दहिफळ येथील सज्जन कोठावळे आणि माजी उपसरपंच बालाजी मते यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाइल आंदोलन केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
जरांगे पाटील यांनी शासनाकडे मांडलेल्या सर्व न्याय्य मागण्या जोपर्यंत सरकार तातडीने मान्य करत नाही, तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही, असा निर्धार या दोन्ही आंदोलकांनी व्यक्त केला. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे आणि आंदोलकांच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक पावले उचलावीत, यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेचा विचार करता उपस्थित ग्रामस्थांकडून आंदोलकांना टाकीवरून खाली उतरण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. दरम्यान, सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही टाकीवरून खाली उतरणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
.........
गौर ः दहिफळ येथील सज्जन कोठावळे आणि माजी उपसरपंच बालाजी मते यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
....
फोटो क्रमांक ःOSM26B06899