((अँकर))
............
चौदा दिवसांत होणार समस्यांचे निराकरण
टपालाच्या तक्रारींसाठी आता दरमहा ‘डाक अदालत’
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ३ ः टपाल सेवा वापरताना येणाऱ्या अडचणी, विलंब आणि ग्राहकांच्या प्रलंबित गाऱ्हाण्यांची वेळेत व प्रभावी सोडवणूक करण्यासाठी भारतीय डाक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२६ पासून दरमहा ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात येणार असून, प्राप्त तक्रारींचे अवघ्या १४ दिवसांच्या आत निराकरण केले जाणार आहे.
ही डाक अदालत विभागीय, प्रादेशिक आणि मंडळ स्तरावर अनुक्रमे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होईल. धाराशिव विभागाची विभागीय डाक अदालत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत येथील भानूनगर येथील अधीक्षक कार्यालयात पार पडेल. सुटी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी ही अदालत होईल.
.......
ई-मेल आणि व्हीसीची सोय
ग्राहकांना आपली तक्रार प्रत्यक्ष, टपालाद्वारे किंवा sposmd.mah@gmail.com या ई-मेलवर पाठवता येईल. प्रत्यक्ष येणे शक्य नसलेल्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय देण्यात आली असून, धाराशिव मुख्य डाकघरात यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
.........
((कोट))
टपाल सेवा थेट नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराशी जोडलेली असल्याने तक्रारींचे वेळेत निवारण होणे गरजेचे आहे. दरमहा होणाऱ्या या अदालतीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
- आर.एस. बोटलावार, डाक अधीक्षक, धाराशिव