Sambhaji Nagar : टॅंकर गळतीने अर्धे शहर गॅसवर ; संभाजीनगरच्या सिडकोतील घटना,यंत्रणांची तारांबळ, दहा तासांनी स्थिती नियंत्रणात

शहर साखर झोपेत असताना एलपीजी गॅसची वाहतूक करणारा टॅंकर गुरुवारी भल्या पहाटे सिडकोतील उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढला आणि त्याच्या मोठ्या आवाजाने यंत्रणांसह नागरिकांची झोपमोड केली.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : शहर साखर झोपेत असताना एलपीजी गॅसची वाहतूक करणारा टॅंकर गुरुवारी भल्या पहाटे सिडकोतील उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढला आणि त्याच्या मोठ्या आवाजाने यंत्रणांसह नागरिकांची झोपमोड केली. टॅंकरमधून सुरू झालेली प्रचंड गॅस गळती थोपविण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणांची तारांबळ उडाली. शहराची जीवनवाहिनी असलेल्या जालना मार्गावर हा प्रकार घडल्याने परिसरातील वाहतूक, शाळा, वीजपुरवठा, इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या.

सिडको एन ३, एन ४, एन ५ भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यासह घरी वीज, गॅसचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला. सूचना मिळताच हजारो नागरिकांनी पटापट घरे खाली केली. या घटनेमुळे अर्धे शहर गॅसवर होते. सुमारे शंभर बंब/टॅंकरद्वारे केलेला पाण्याचा मारा, गॅसची दुसऱ्या वाहनात भरण्यासाठी करावी लागलेली कसरत, बंदोबस्त, वाहतूक नियमन आदींनी दिवस याच विषयावर चर्चेचा ठरला. सायंकाळी स्थिती निवळल्यावर यंत्रणांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : अहवालाचा शिक्षण विभागावर ‘असर’ ; पर्यवेक्षण यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना,शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी

पोलिस, महापालिकेचा अग्निशमन विभाग, एचपी गॅसचे तांत्रिक अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ यांच्या अथक परिश्रमानंतर दुपारी तीनला गॅस गळती आटोक्यात आणण्यात यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. यादरम्यान सिडको परिसरातील सुमारे लाखावर नागरिक भीतीच्या सावटाखाली होते.

दुर्घटना घडताच काय केले?

सायबर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांचे गुड मॉर्निंग पथक गस्तीवर होते. त्यांना हा प्रकार दिसताच तत्काळ अग्निशमन दल, पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला माहिती दिली. उड्डाणपुलाच्या कठड्याला टॅंकर धडकल्याचा आवाज रामगिरी हॉटेलपासून सेव्हन हिल्सपर्यंत नागरिकांनी ऐकला. एपीआय सातोदकर यांनी महावितरणला कळवून सिडको उड्डाणपुलावरील, जालना रस्त्यावरील पथदिवे बंद केले. तोपर्यंत पोलिस दाखल झाले होते. पोलिसांनी तत्काळ सेव्हन हिल्स उड्डाणपुलावरील वाहतूक सिडको चौकापर्यंत दोन्ही बाजूंनी बंद केली.

दर अर्ध्या तासाला मोजमाप

एचपीसीएल, गरवारे कंपनीने एलपीजी मीटरची व्यवस्था केली होती. या मीटरद्वारे किती अंतरापर्यंत किती प्रमाणात गॅस गळती झाली, हे समजते. ही पद्धत दर अर्ध्या तासाला मोजमाप करण्यात येत होते. त्याचा अंदाज घेऊन पोलिस, आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे तातडीने प्रयत्न केले.

असा घडला अपघात

क्रांती चौक परिसराकडून चिकलठाण्यातील एचपी गॅस डेपोमधून १७ हजार ५०० टन गॅस घेऊन टॅंकर (क्र. एम.एच.४३, बी. पी. ५९०२) पहाटे जात होता. तो वसंतराव नाईक चौकातील सिडको उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूने कठड्यावर चढला. या अपघातात टॅंकरचे केबीन पूर्णतः चेपले गेले. त्याच बाजूला असलेल्या तीनपैकी दोन व्हॉल्व्हला जबरदस्त धक्का लागला. त्यातील एका व्हॉल्व्हला दोन इंचाचे छिद्र पडले, दुसरा पूर्णपणे वाकडा झाला. आपत्कालीन स्थितीत व्हॉल्व्हमधून गळती होऊ नये म्हणून त्याला लॉक असतात; पण या अपघातात व्हॉल्व्हला जिथे लॉक होतो त्याच्या वरच्या बाजूनेच गळती सुरू झाली होती. या गॅस गळतीचा जवळपास चारशे ते पाचशे मीटरपर्यंत मोठा आवाज जात होता. दुसऱ्या व्हॉल्व्ह हा लिक्विडचा असल्याने त्याचा धोका कमी होता.

अधिकारी, कर्मचारी ठरले ‘देवदूत’

घटना घडताच पोलिस दलातील अधिकारी, औद्योगिक विभागाचे अधिकारी, महापालिकेचा रेस्क्यू विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जिवाची बाजी लावून शर्थीचे प्रयत्न केले. जिवाची पर्वा न करता या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉल दूर सारून स्वतःला झोकून देत योगदान दिले. अगदी ‘देवदूता’सारखे सारेजण धावले. त्यामुळे जीवितहानीसारखा प्रकार टळला.

घटनास्थळापासून अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वसाहत खाली केली होती. परिसरातील शाळा, दुकाने, हॉटेल्स या आस्थापना तत्काळ बंद केल्या. घडलेली घटना वाईटच होती. पोलिस दलासह सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळाले. सायंकाळपर्यंत वाहतूक सुरू केली. घटना घडताच टॅंकर चालक पळून गेल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई करणार आहोत.

-मनोज लोहिया,

पोलिस आयुक्त

उद्योगनगरीही मदतीला

माहिती मिळताच उद्योगनगरी मदतीला धावली. गरवारे कंपनी, ग्रीव्हज् कॉटन, वोक्हार्ट, स्टरलाइट, इंडेन गॅस, बजाज कंपनी या कंपन्यांच्या म्युच्युअल ॲण्ड रिस्पॉन्स टीमने (ग्रुप) तत्काळ आवश्यक त्या उपकरणांसह घटनास्थळी धाव घेत मदत केली. यामध्ये अग्निशमन बंब, रुग्णवाहिकांसह इतर मदतीसोबतच तांत्रिक मदत खूप मोलाची ठरली. बहुतांश कंपन्यांनी स्वतःचे सुरक्षारक्षकही पुरविले होते.

असा आहे घटनाक्रम

  • पहाटे ५.१५ : टॅंकर पुलाच्या कठड्यावर चढला.

  • ५.२० ते ५.४५ : अग्निशमन दलाचे अनेक बंब दाखल.

  • ५.३० : रस्ता आणि उड्डाणपुलावरील पथदिवे बंद.

  • ७.१० : घटनास्थळापासून पाचशे मीटरवरील परिसर पोलिसांनी व्यापला.

  • ७.३० ते १० : घरात वीज उपकरणे, गॅस सुरू न करण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन.

  • ८.२० पर्यंत सुरू झालेल्या शाळा, महाविद्यालये पोलिसांनी बंद केली.

  • वसंतराव नाईक परिसरातील वसतिगृहातील हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षित हलविले.

  • १०.१५ : विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड दाखल

  • १०.२० : महापालिका आयुक्तांकडून पाहणी

  • ७ ते ११ : सिडको एन-३, एन-४, एन-५ परिसरातील हजारो नागरिकांचे स्थलांतर.

  • घटना घडली तेव्हा ७ टक्के धोका, तोच १०.३७ ते १२.२० अखेर ६० टक्क्‍यांवर पोचला

  • जळगावहून आपत्कालीन मदत वाहन दाखल.

  • दुपारी २.५८ : गॅस ट्रान्स्फर पूर्ण, धोका पूर्णतः टळला, नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com