शासकीय निवासस्थानात धाडसी चोरी
---------
परभणीत ८२ हजार रुपयांचा ऐवज पळवला
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २४ ः शिवाजीनगर येथील बी. ॲण्ड सी. च्या शासकीय निवासस्थानात चोरट्यांनी गुरुवारी (ता. २२) गेट व घराचे कुलूप, कोंडा तोडून रोख रकमेसह सोन्या- चांदीचे दागिने असा ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयात लिपिक म्हणून काम करणारे अजय सुखदेव चौधर यांनी शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आपण गुरुवारी (ता.२२) पत्नी व मुलासह छत्रपती संभाजीनगर येथे गेलो होते. शुक्रवारी (ता.२३) सकाळी घरी आलो असता घराच्या चॅनल गेटचे लॉक व घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कोंडा तुटल्याचे दिसून आले. घरातील बेडरूममध्ये कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरी गेल्याचे निदर्शनास आले. त्यात रोख २५ हजार रुपये, १५ हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के व अन्य चांदीच्या वस्तु, ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा ८२ हजार रुपयाचा ऐवज चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील ही शासकीय निवासस्थाने मुख्य रस्त्यावर असून जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, सीईओ यांच्या निवासस्थानांसह नवा मोंढा पोलिस ठाणे देखील येथून जवळच आहे. तरी देखील चोरट्यांनी चोरीचे धाडस दाखवल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
-------------