तालुकाध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड
गेवराई ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेवराई युवक तालुकाध्यक्षपदी दत्ता वाघमारे यांची निवड करण्यात आली. माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, रणवीर पंडित, युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, पृथ्वीराज पंडित यांनी निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. निवडीनंतर प्रथमच गेवराईत दाखल होताच त्यांचा सत्कार करण्यात आला. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
------
माउली विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात
बीड ः भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त माउली विद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण करावी, असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापकांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. बाळगोपाळांनी विविध पुस्तकांचे वाचन केले, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल असे अनेक उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले. नंतर प्रत्येक तुकडीमध्ये एक तास प्रकट व मूकवाचन घेऊन विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा देण्यात आली.
------
शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
बीड ः येथील सहारा परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शहीद भगतसिंग विचारमंच बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी सहारा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष कलीमभाई काझी, अबरार चाऊस, डॉ. राजीव काळे, जिल्हा कार्याध्यक्ष सुशील शिंदे, महिला आघाडीच्या मीना नाईक यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष भाई जानू यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
-----
‘मानवी मूल्यांची जोपासना आवश्यक’
अंबाजोगाई ः सध्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे मानवाचे आर्थिक संदर्भ व समाजरचना झपाट्याने बदलत आहे. अशा काळात संविधानातील मानवी मूल्यांची जपणूक करूनच न्यायपूर्ण समाज निर्माण होऊ शकतो. लोकशाहीचा आत्मा असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीने करत मूलभूत अधिकार व कर्तव्यांचा समतोल राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. योगेश्वरी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे होते, तर व्यासपीठावर उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर, सचिव गणपत व्यास, सहसचिव प्रा. एन. के. गोलेगावकर, कोषाध्यक्ष माणिकराव लोमटे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुरेश खुरसाळे यांनी, सूत्रसंचालन प्रा. प्रणाली कुलकर्णी यांनी केले, तर प्राचार्य डॉ. आर. डी. जोशी यांनी आभार मानले.
-------
पाणवठ्यांची निर्मिती करण्याची मागणी
शिरूर कासार ः तालुक्यातील वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा मोठा वावर असून पाण्याच्या शोधात हरिण, मोर, ससे आदी वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ते जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. याकडे वनविभागाने तातडीने लक्ष देऊन वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करून पाणी सोडावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून करण्यात आली आहे. यावेळी बाळासाहेब पठाडे, संतोष शिंदे, दत्तात्रय सानप, अमोल गर्जे, विठ्ठल सानप, एकनाथ वाघ, गोविंद गिरी, नामदेव घुले, शिवाजी वाघमारे, एकनाथ हावळे, भानुदास सानप, महादेव सानप, श्रीमंत गर्जे आदींची उपस्थिती होती.
-------
श्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे महापूजेचे आयोजन
माजलगाव ः श्री दत्तात्रेय प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे शुक्रवारी (ता. २४) भव्य धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात एकाच वेळी ११०० जोडप्यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे. महंत श्री लक्ष्मण शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य संस्थानच्या वतीने दिले जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. तरी भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रभाकर केशवराव खोसे आणि प्रभाकर प्रसाद सेवेकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
------
बालिकांचा आणि मातांचा सन्मान
बीड ः जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा व समाजात स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत व्हावे, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने सलग पाचव्या वर्षी स्त्री जन्माचे स्वागत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत नवरात्रीपासून भाऊबीजेपर्यंत शासकीय व खाजगी रुग्णालयांत जन्मलेल्या नवजात बालिकांचा व त्यांच्या मातांचा साडीचोळी व भेटवस्तू देऊन सन्मान केला जात आहे. यात रोटरीच्या महिला सदस्यांची आदीशक्ती टीम हिरिरीने पुढाकार घेत असून अध्यक्ष डॉ. अशोक बोरकर, सचिव डॉ. सुधीर रूईकर, प्रकल्प प्रमुख डॉ. रश्मी बोरकर, डॉ. सतीश रूईकर, डॉ. वर्षा रूईकर, डॉ. स्मिता कुलकर्णी, प्रा. संजय कुलकर्णी, डॉ. अनुजा बोरकर, डॉ. सुहास कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत.
-------
ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा
गेवराई ः तालुक्यातील गोविंदवाडी येथील पाझर तलावात सुरू असलेले अवैध विहीर खोदकाम व बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गोविंदवाडी तलावात काही व्यक्तींकडून बेकायदेशीररीत्या विहीर खोदकाम केले जात आहे. यामुळे गावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून परिसरातील शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे. याप्रकरणी तहसीलदार व संबंधित विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाने तातडीने हे अवैध काम थांबवावे, अन्यथा आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
------
स्कूल कनेक्ट अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बीड ः महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये स्कूल कनेक्ट अभियान राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार १०० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी व्हावी व शालेय विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील शिक्षणाच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने के. एस. के. महाविद्यालयाच्या कला विभागातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. विनोद जोगदंड, कला विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीश कांबळे, प्रा. संतोष भोसले, प्रा. रवींद्र वाघमारे, प्रा. दत्तात्रय राऊत आदींची उपस्थिती होती.
------
जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
टाकळगाव ः येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच सुशील तौर, मुख्याध्यापक वाघमारे, महादेव सोळंके, लक्ष्मण पवार, गणेश लंगडे, संतोष सोळंके, सखाराम गोरे, वैजनाथ राजपूत, मुकुंद काळे, नाना काळे, शरद वाघमारे, राजेश काळे, आश्विन दुधे, रवी इथापे, कोंडीराम आदी उपस्थित होते.
------
महिला संवाद अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड ः अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडीच्या वतीने गेवराई येथे महिला संवाद अभियान राबवण्यात आले. या अभियानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला आघाडीच्या राष्ट्रीय सचिव रेखा सोन्ने व रूपाली देशपांडे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महिलांचे सक्षमीकरण, कायदेविषयक अधिकार, सुरक्षा, आरोग्य आणि शासकीय योजना या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांनी अन्यायाविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.