दत्तमांजरीतील १५.९३ लाखांचा अपहार
---
कारवाई होत नसल्याचा विभागीय आयुक्तांकडे धाव
----
सारखणी, ता.८ : माहूर तालुक्यातील दत्तमांजरी येथील १४ व्या वित्त आयोगाच्या १५ लाख ९३ हजार २० रुपयांच्या निधीच्या कथित अपहारप्रकरणी कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ता मनोज कीर्तने यांच्यासह काही ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडे धाव घेतली आहे.
कोरोना काळातील निर्बंधांचा गैरफायदा घेत तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. १८ डिसेंबर २०१९ ते ६ एप्रिल २०२१ या कालावधीत १३ धनादेशांद्वारे ही रक्कम काढल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून माहूरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ८ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता. तसेच दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी १५ जुलै २०२४ रोजी कारवाईचे आदेश दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ता कीर्तने यांनी जी. श्रीकांत यांची भेट घेऊन सखोल चौकशी, रक्कम वसुली आणि दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, ग्रामसभा घेण्याबाबत पारदर्शकता राखण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.