मधमाशांची मोहोळ झाले दुर्मिळ
रानफुले, पाणथळ जागा, नैसर्गिक अधिवास घटल्याचा परिणाम
-----
जळकोट, ता. १ (बातमीदार) : ग्रामीण भागात रानावनात, नदीकाठी आणि झाडाझुडपांमध्ये पूर्वी सहज आढळणारी गावरान मधमाशांची मोहोळे आता दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे चविष्ट गावरान मध मिळणेही कठीण होत आहे. शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशके व तणनाशकांचा वाढता वापर, रानफुले आणि झाडांची घटती संख्या, पाण्याची कमतरता तसेच मधमाशांच्या नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मधमाशा केवळ मधनिर्मिती करणारे कीटक नसून शेती आणि पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहेत. फुलांवर बसताना त्यांच्या माध्यमातून परागीभवनाची प्रक्रिया घडते. यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनाला मदत होते. मधमाशांची संख्या घटल्यास परागीभवनावर आणि पर्यायाने शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतात तण नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांमुळे नैसर्गिक वनस्पती आणि रानफुले नष्ट होतात. परिणामी मधमाशांना मिळणारा मकरंद आणि परागकणांचे प्रमाण कमी होते. कीटकनाशकांच्या थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्कामुळेही त्यांच्या जीवनचक्रावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फुलोऱ्याच्या काळात फवारणी करताना कृषितज्ज्ञांचा सल्ला घेणे, शेताच्या बांधावरील रानफुले व स्थानिक वनस्पतींचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
पूर्वी पाणथळ जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत्या. रानगवत, रानफुले आणि फुलोऱ्यातील विविध पिकांमुळे मधमाशांना अन्न मिळत होते. आता फुले आणि पाण्याचे स्रोत कमी झाले असून कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे मधमाशांसारख्या लहान जीवांना तग धरणे कठीण होत असल्याचे मत प्रा. डॉ. अशोक मुंडे यांनी व्यक्त केले.
-----
मधमाशांच्या मोहोळांची संख्या नेमकी कोणत्या कारणांमुळे कमी होत आहे, याचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. कीटकनाशकांमुळे हा परिणाम होत असल्यास मधमाशांना कमीत कमी हानी पोचवणाऱ्या तणनाशक व कीटकनाशकांबाबत संशोधन होणे आवश्यक आहे.
-प्रा. डॉ. अशोक मुंडे, प्राणिशास्त्र विभागप्रमुख, संभाजीराव केंद्रे महाविद्यालय