देगलूर : दीड लाख रुपये किमतीचा ऐवज असलेली बॅग पोलिसांच्या उपस्थितीत वृद्ध महिलेच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करताना शेख याकूब.
----
आॅटोत विसरलेली दीड लाखाची बॅग आजीबाईंना परत
---
ऑटोचालक शेख याकूब यांचा प्रामाणिकपणा; देगलूर पोलिसांकडून सत्कार
---
देगलूर, ता. १९ (बातमीदार) : प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचा प्रत्यय देगलूर शहरातील एका घटनेतून आला आहे. ऑटोचालक शेख याकूब यांनी आपल्या रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाचे साहित्य कोणताही मोह न बाळगता संबंधित आजीबाईंना परत केले. परत केलेल्या दागिन्यांची आणि पैशांची अंदाजे किंमत दीड लाख रुपये असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
सावरमाळ (ता.मुखेड) येथील वृद्ध महिला जनाबाई कोंडिबा अज्जेवाड या माहेरी सुगाव (ता. देगलूर) येथे जात होत्या. यासाठी त्यांनी देगलूर शहरातून शेख याकूब यांच्या ऑटो रिक्षाने प्रवास केला. इच्छितस्थळी उतरताना घाईगडबडीत त्यांची बॅग रिक्षातच राहून गेली. या बॅगेत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि कपडे असा अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज होता. काही वेळाने शेख याकूब यांच्या निदर्शनास ही बॅग आली. बॅगेत दागिने आणि रोख रक्कम असल्याचे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट देगलूर पोलिस ठाणे गाठले. शेख याकूब यांचा मुलगाही ठाणे शहरात पोलिस दलात कर्तव्य बजावत असल्याने त्यांनी प्रथम पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बॅगेतील सर्व ऐवज पोलिसांच्या स्वाधीन करून घडलेला प्रकार सांगितला.
---
पोलिसांनीही दाखविली तत्परता
पोलिसांनीही तत्परता दाखवत बॅगेतील आधारकार्डच्या आधारे जनाबाई यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांच्या उपस्थितीत ऑटोचालक शेख याकूब यांच्या हस्ते बॅग संबंधितांना सुखरूप परत करण्यात आली. आपला दीड लाख रुपयांचा ऐवज परत मिळाल्याने जनाबाई आणि त्यांचे नातेवाईक भावूक झाले. त्यांनी शेख याकूब यांचे आभार मानले. दरम्यान, देगलूर पोलिस प्रशासनानेही शेख याकूब यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेत त्यांचा सत्कार केला.