छत्रपती संभाजीनगर ः ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याच्या समारोपप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस.
--
एकत्रित राहिलो तरच अधिराज्य करू
------------
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य
--
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १ ः ‘‘अठरा पगड जाती एकत्रित आल्या, मावळे लढले, त्यांचा मुकाबला कुणीच करू शकले नाही. कारण ते पगारासाठी नाही, हिंदवी स्वराज्यासाठी लढले. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढले. याप्रमाणे आपण एकत्रित राहिलो तरच अधिराज्य करू. विभाजीत राहिलो तर गुलामगिरी कडे जाऊ,’’ असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. सध्याची राजकीय परिस्थिती, मित्रपक्षांत चाललेली धुसफूस या पार्श्वभूमीवर या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा ऐकायला मिळाली.
देवेंद्र सेवा महोत्सव समितीतर्फे शहरातील जबिंदा मैदानात २६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याचा समारोप रविवारी (ता. १) झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज (नाणिज ), प्रकाशानंदगिरी (देवगड), रामगिरी महाराज (सरालाबेट), शिवाजी महाराज (नारायणगड), विठ्ठल महाराज शास्त्री (गहिनीनाथ गड) या साधुसंतांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही यांनी देश आणि राज्याला नामोहरम केले होते. धर्मावर, संस्कृतीवर हल्ला व्हायचा. महिलांवर अत्याचार व्हायचे. सर्व गुलामगिरीत गेले होते. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ते नसते तर आपणही नसतो. तेव्हा अठरापगड जातीतील मावळे एकत्र लढले. त्यानुसार आपणही एकत्रित राहिले पाहिजे. आपल्यातील भेद दूर होऊन एक झालो पाहिजे. मावळे एकत्रित असले पाहिजेत. त्यातून भगव्याचा विजय होईल. भेदभावरहित नवमहाराष्ट्राच्या उभारणीकरिता शिवरायांचा, साधुसंतांचा आशीर्वाद प्राप्त करूया.’’
पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, आमदार सुहास शिरसाठ, महापौर समीर राजूरकर, महापालिका स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी आमदार संजय केणेकर आदी उपस्थित होते.
----------
शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज
----------
‘‘दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर द्यायची आवश्यकता आहे. कितीही संकटे आली तरी हरायचे नाही, ही प्रेरणा शिवरायांच्या चरित्रातून त्यांना मिळेल. त्यांच्यामध्ये नवीन उभारी निर्माण झाली पाहिजे, हा ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याचा उद्देश आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच. आता लोकही त्यांच्या पाठीशी उभे राहात आहेत,’’ असे फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगर, जालना येथील उद्योजकांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत ६ कोटी ३३ लाखांचा धनादेश आपल्याकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगितले.
------------
टाक्या, शिलाई यंत्राचे वाटप
------------
देवेंद्र सेवा महोत्सव समितीतर्फे शेतकरी तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी एक हजार पाण्याच्या टाक्या, महिलांना स्वावलंबी करण्यासाठी पाचशे शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. याचीही सुरवात या कार्यक्रमापासून करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी सांगितले.
-------------
शिवरायांच्या पुतळ्यासाठी हार
------------
शहरातील क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी समितीतर्फे एक हार देण्यात आला. तो महापौर समीर राजूरकर, महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे सोपविण्यात आला.
ABD26J82577, ABD26J82578