तेलंगणातील ब्लॉकमुळे
‘देवगिरी’ होणार लेट
....
छत्रपती संभाजीनगर, ता. २६ : तेलंगणात दक्षिण मध्य रेल्वेने विविध कामे हाती घेतली असून, त्याचा फटका देवगिरी एक्स्प्रेस आणि काचीगुडा-पूर्णा या रेल्वेंना बसणार आहे. नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही गाड्या सात दिवस एक तास उशिराने धावणार आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात मेडचल-अक्कन्नापेट दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. शिवाय मनोहराबाद यार्ड येथे अतिरिक्त नवीन रेल्वे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत. १४ नोव्हेंबरपासून २२ नोव्हेंबरपर्यंत ही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. मराठवाड्यातून धावणाऱ्या दोन रेल्वेंना एक तास विलंब होणार आहे. १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेसच्या सात फेऱ्या एक तास विलंबाने होतील. १६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत लिंगमपल्ली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई देवगिरी एक्स्प्रेसच्या सात फेऱ्या एक तास विलंबाने धावतील. १६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत काचीगुडा-पूर्णा रेल्वेगाडीच्या सात फेऱ्या एक तास विलंबाने धावतील. याशिवाय १४ ते २० नोव्हेंबर कालावधीत भगत की कोठी-काचीगुडा एक्स्प्रेस ही रेल्वे सात दिवस ७५ मिनिटे उशिराने धावेल.